FASTag Annual Pass: भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (79th Independence Day) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनचालकांसाठी वार्षिक फास्टॅग पास (FASTag Annual Pass) सेवा सुरू केली आहे. आजपासून ‘FASTag वार्षिक पास’ सुरू करण्यात आला असून, यामुळे तुम्ही फक्त एकाच पेमेंटमध्ये वर्षभर राष्ट्रीय महामार्गांवरूनप्रवास करू शकता.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त 3,000 रुपये भरून तुम्ही वर्षभर किंवा 200 टोल ट्रिप्स (यापैकी जे आधी पूर्ण होईल) मोफत प्रवास करू शकता. या
मुळे वाहनचालकांची वर्षाला सुमारे 7,000 रुपयांपर्यंत बचत होईल. प्रत्येक ट्रिपचा सरासरी खर्च 80-100 रुपयांवरून फक्त 15 पर्यंत कमी होईल. हा पास केवळ कार, जीप आणि व्हॅनसारख्या वाहनांसाठी लागू आहे आणि तो तुमच्या सध्याच्या फास्टॅगला जोडला जाईल.
FASTag वार्षिक पास कसा खरेदी करायचा?
- राजमार्गयात्रा ॲप (Rajmargyatra app) डाउनलोड करा किंवा NHAI च्या वेबसाइटला भेट द्या.
- तुमच्या मोबाइल नंबर आणि वाहन नोंदणी क्रमांकासह लॉगइन करा.
- तुमचा सध्याचा फास्टॅग (FASTag) सक्रिय असल्याची खात्री करा.
- ऑनलाइन 3,000 रुपयांचे पेमेंट करा.
- पेमेंट यशस्वी झाल्यावर पास तुमच्या फास्टॅगसोबत जोडला जाईल आणि तुम्हाला एसएमएस (SMS) द्वारे याची पुष्टी मिळेल.
हा पास दुसऱ्या वाहनावर वापरता येणार नाही. तसेच, तो फक्त राष्ट्रीय महामार्गांवर वैध आहे, राज्य महामार्गांवर नाही. या सुविधेमुळे टोल प्लाझावरील गर्दी कमी होऊन लांबच्या प्रवासाला अधिक सोयीचे आणि कमी खर्चाचे बनवण्याची अपेक्षा आहे.