Radhika Yadav | गुरुग्रामच्या सेक्टर 57 मध्ये काल (10 जुलै) सकाळी 25 वर्षीय राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्या वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी दीपक यादव (51) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
राधिकाच्या टेनिस अकादमीमुळे गावात होणारी सामाजिक टीका आणि तिच्या करिअरमुळे वडिलांना होणारा अपमान सहन न झाल्याने ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
हत्येमागचे कारण काय?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दीपक यादव यांना वाजिराबाद गावात राधिकाच्या टेनिस अकादमीच्या उत्पन्नावरून थट्टा सहन करावी लागत होती. त्यांनी राधिका अकादमी बंद करावी अशी मागणी केली, परंतु तिने नकार दिला. याच वादातून त्यांनी स्वयंपाकघरात राधिकावर तीन गोळ्या झाडल्या. दीपक यांनी कबुलीजबाबात सामाजिक टीकेमुळे नैराश्य आल्याचे सांगितले. राधिकाची आई मंजू यादव यांनी ताप आणि काही न पाहिल्याचे कारण देत जबाब देण्यास नकार दिला.
सेक्टर 56 पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाली असून, पोलिस राधिकाच्या संभाव्य अफेअर किंवा तिच्या इंस्टाग्राम रील्सवर वडिलांचा आक्षेप यासारख्या इतर पैलूंचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, दीपक यांचा राग सामाजिक अपमानामुळे वाढला होता.
राधिका स्कॉटिश हाय इंटरनॅशनल स्कूलमधून वाणिज्य शाखेची पदवीधर होती आणि तिने शालेय जीवनापासून टेनिस खेळायला सुरुवात केली. अलीकडेच खांद्याच्या दुखापतीमुळे ती फिजिओथेरपी घेत होती, पण तिने टेनिस अकादमी आणि तरुणांना प्रेरणा देणे सुरू ठेवले होते. तिच्या उत्साहाने आणि ट्रॉफी जिंकण्याच्या रील्सनी ती लोकप्रिय होती.