Ethanol Blending India: भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे (Ethanol Blending India) उद्दिष्ट गाठले आहे. विशेष म्हणजे भारताने वेळेआधीच हा टप्पा गाठला आहे. ही कामगिरी मूळ 2030 च्या लक्ष्यापेक्षा पाच वर्षे आधी पूर्ण करण्यात आली. याबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी घोषणा केली.
11 वर्षांत 1.5 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत झपाट्याने प्रगती
2014 साली पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा दर केवळ 1.5 टक्के होता. गेल्या 11 वर्षांत या दरात अनेक पटींनी वाढ होऊन तो 2025 पर्यंत 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामागे सरकारची धोरणात्मक दिशा, शाश्वत इंधनावर भर, आणि देशांतर्गत उत्पादनात वाढ हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत.
पुरी यांनी सांगितले की, 2014 मध्ये इथेनॉल उत्पादन 38 कोटी लिटर होते, ते जून 2025 पर्यंत 661.1 कोटी लिटरपर्यंत पोहोचले आहे. यामुळे भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलावरचा अवलंब मोठ्या प्रमाणात कमी केला असून सुमारे 1.36 लाख कोटी रुपयांची परकीय चलन बचत साधण्यात आली आहे.
शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाला मोठा फायदा
इथेनॉल मिश्रणाच्या योजनेमुळे देशांतर्गत डिस्टिलरी उद्योगाला 1.96 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला असून, शेतकऱ्यांना 1.18 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. ऊसासारख्या पिकांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे ग्रामीण भागात उत्पन्नात वाढ झाली असून, कृषी अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे.
याशिवाय, पर्यावरणीय दृष्टीनेही या निर्णयाचा सकारात्मक परिणाम जाणवला आहे. इथेनॉल मिश्रणामुळे 698 लाख टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी झाले असून, भारताच्या हवामान धोरणांना त्यामुळे हातभार लागला आहे.