Home / देश-विदेश / नारी शक्तीचा गौरव! भारतीय महिला अधिकारी ‘समुद्र प्रदक्षिणा’ मोहिमेवर; करणार 26,000 नॉटिकल मैल प्रवास

नारी शक्तीचा गौरव! भारतीय महिला अधिकारी ‘समुद्र प्रदक्षिणा’ मोहिमेवर; करणार 26,000 नॉटिकल मैल प्रवास

Samudra Pradakshina Mission: भारतीय सैन्य दलातील महिलांच्या शौर्याचा आणखी एक अध्याय लिहिला गेला आहे. तिन्ही दलातील महिला अधिकारी ‘समुद्र प्रदक्षिणा’...

By: Team Navakal
Samudra Pradakshina Mission

Samudra Pradakshina Mission: भारतीय सैन्य दलातील महिलांच्या शौर्याचा आणखी एक अध्याय लिहिला गेला आहे. तिन्ही दलातील महिला अधिकारी ‘समुद्र प्रदक्षिणा’ या माहिमेवर निघाल्या आहेत.

नुकतेच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून ‘समुद्र प्रदक्षिणा’ या ऐतिहासिक आणि पहिल्याच तिन्ही सेवांच्या सर्व-महिलांच्या जागतिक नौकानयन मोहिमेला व्हर्च्युअली हिरवा झेंडा दाखवला. या मोहिमेत भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुसेनेच्या 10 महिला अधिकारी सहभागी झाल्या आहेत.

Samudra Pradakshina Mission: देशाची ‘नारी शक्ती’ जागतिक विक्रम रचणार

स्वदेशी बनावटीच्या IASV त्रिवेणी या जहाजातून या महिला पुढील 9 महिन्यांसाठी प्रवास करणार आहेत. या प्रवासात त्या 26,000 हून अधिक नॉटिकल मैलांचे अंतर पार करतील, ज्यामध्ये धोकादायक समुद्र, थंड वारे आणि वादळांचा सामना करावा लागणार आहे.

आपल्या व्हर्च्युअल संबोधनात राजनाथ सिंह म्हणाले, “ही मोहीम ‘नारी शक्ती’, सामूहिक सामर्थ्य आणि तिन्ही सेवांमधील एकतेचे प्रतीक आहे. हे आत्मनिर्भर भारत आणि त्याच्या जागतिक दृष्टिकोनाचेही प्रतीक आहे.”

हा प्रवास केवळ एका जहाजावरील सफर नसून, शिस्त आणि इच्छाशक्तीचा एक आध्यात्मिक प्रवास आहे. आपल्या अधिकार्‍यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण त्यांचा निर्धार त्यांना यश मिळवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Samudra Pradakshina Mission: मोहिमेतील महत्त्वाच्या टप्पे

  • IASV त्रिवेणी ही नौका दोन वेळा विषुववृत्त पार करेल.
  • प्रवासात केप लीविन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप हे तीन मोठे ‘केप्स’ पार केले जातील.
  • हे दल फ्रेमांटल (ऑस्ट्रेलिया), लिटलटन (न्यूझीलंड), ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना) आणि केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) या चार बंदरांवर थांबेल.
  • मोहीम मे 2026 मध्ये मुंबईत परत येईल.

लेफ्टनंट कर्नल अनुजा वरूडकर यांच्या नेतृत्वाखालील या पथकात स्क्वॉड्रन लीडर श्रद्धा पी राजू, मेजर कर्मजीत कौर, मेजर ओमिता दळवी, कॅप्टन प्रजक्ता पी निकम, कॅप्टन दौली बुटोला, लेफ्टनंट कमांडर प्रियंका गुसाईं, विंग कमांडर विभा सिंग, स्क्वॉड्रन लीडर अरुवी जयदेव आणि स्क्वॉड्रन लीडर वैशाली भंडारी यांचा समावेश आहे. त्यांनी या मोहिमेसाठी 3 वर्षांचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे.

हे देखील वाचा – Gold Rate : दागिन्यांसाठी अठरा कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या