X ने भारतात 8000 अकाउंट्स केले ब्लॉक, सरकारने दिला होता आदेश; कारण काय?

India Asks X to Block Accounts

India Asks X to Block Accounts | एलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने 8 हजारांपेक्षा अधिक अकाउंट्स ब्लॉक केले आहेत. भारत सरकारने आदेश दिल्यानंतर एक्सकडून हे अकाउंट्स ब्लॉक करण्यात आले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

एक्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारत सरकारकडून आम्हाला कार्यकारी आदेश (Executive Orders) मिळाले आहेत, ज्यामध्ये 8000 हून अधिक अकाउंट्स भारतात बंद करण्याची मागणी आहे. या आदेशांचे पालन न केल्यास आम्हाला मोठ्या आर्थिक दंडाचा तसेच आमच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या तुरुंगवासाचा सामना करावा लागू शकतो.” यामध्ये काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था (International News Organizations) आणि प्रमुख एक्स वापरकर्त्यांचे (Prominent X Users) अकाउंट्सही समाविष्ट असल्याचे एक्सने स्पष्ट केले.

एक्सने भारतातील सूचीबद्ध अकाउंट्सवर बंदी घातल्याचे मान्य करताना सांगितले की, “हा निर्णय घेणे सोपे नव्हते, पण भारतीय नागरिकांना माहितीपर्यंत पोहोच देणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.” प्लॅटफॉर्मने असेही म्हटले की, “आपली सेवा भारतात सुरू ठेवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.”

“हे कार्यकारी आदेश सार्वजनिक होणे गरजेचे आहे, कारण माहितीचा अभाव हा गैरजबाबदारीला प्रोत्साहन देतो आणि मनमानी निर्णयांना कारणीभूत ठरतो,” असे प्लॅटफॉर्मने नमूद केले.

पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स आणि प्रसिद्ध व्यक्तींवर भारतात बंदी

भारत सरकारने यापूर्वीही डझनभर पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स बंद केले होते. या चॅनेल्सवर प्रक्षोभक आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा आरोप होता. त्यात अनेक पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांचा समावेश होता.

तसेच, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे. यासोबतच, फवाद खान , आतिफ अस्लम, बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहिद आफ्रिदी आणि वसीम अक्रम यांसारख्या अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटी आणि खेळाडूंचे अकाउंटही ब्लॉक करण्यात आले आहे.

ही कारवाई भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) नंतर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन चुकीची माहिती (Misinformation) पसरवल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर झाली.