भारत-EFTA व्यापार कराराला स्वित्झर्लंडची अंतिम मंजुरी, देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होणार? जाणून घ्या

India Switzerland Trade

India Switzerland Trade | भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी स्वित्झर्लंडने (India Switzerland Trade) भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना (EFTA) यांच्यातील ऐतिहासिक व्यापार कराराला मंजुरी दिली आहे. स्वित्झर्लंडच्या राजदूत माया टिसाफी यांनी ही माहिती दिली.

हा करार (India EFTA Agreement) ऑक्टोबर 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे. या करारातून पुढील 15 वर्षांत $100 अब्ज गुंतवणूक (सुमारे ₹8.3 लाख कोटी) आणि 10 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

कराराचे महत्त्व

16 वर्षांच्या वाटाघाटीनंतर मार्चमध्ये स्वाक्षऱ्या झालेल्या या कराराने भारतीय बाजारपेठ स्वित्झर्लंडसाठी खुली होईल. सीमाशुल्क प्रक्रिया सुधारून व्यापार अडथळे कमी होतील, असे टिसाफी यांनी सांगितले. हा करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वित्झर्लंडकडून भारतात गेल्या 25 वर्षांत गुंतवणूक वेगाने वाढली आहे. गुंतवणूक 2000 मध्ये 5,935 कोटी रुपये होती, जी 2024 मध्ये ₹1,07,736 कोटीवर पोहोचली. 330 हून अधिक स्विस कंपन्या अभियांत्रिकी, फार्मास्युटिकल्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.

स्वित्झर्लंड सरकार गुंतवणूक सुलभ करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांसोबत भागीदारी करत आहे. फेब्रुवारीमध्ये ईएफटीए डेस्कची स्थापना झाली असून, बेंगळुरूमधील स्विस-इंडियन इनोव्हेशन प्लॅटफॉर्मने तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवले आहे.

77 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मैत्रीच्या नात्याला हा करार बळकट करेल. हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धनातही सहकार्य वाढत आहे, असे टिसाफी यांनी नमूद केले.