भारताची मोठी तयारी! ताफ्यात सामील होणार हायटेक डिफेन्स सॅटेलाइट्स; सुरक्षा होईल अधिक मजबूत

India Surveillance Satellite 

India Surveillance Satellite | पाकिस्तानसोबतच्या संघर्षानंतर भारताने आपल्या उपग्रहाधारित पाळत ठेवणाऱ्या प्रणालीला (Satellite Surveillance) गती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने खासगी अंतराळ कंपन्यांना संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार हायटेक डिफेन्स सॅटेलाइट्स (Defence Satellites) अधिक वेगात विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत.

पूर्वी जे काम पूर्ण होण्यासाठी ४ वर्षे लागत होती, ते आता फक्त १२ ते १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. त्यामुळे २०२८ ऐवजी हे उपग्रह २०२६ च्या अखेरीस तयार होतील, असे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. या हायटेक डिफेन्स सॅटेलाइट्समुळे भारताची सुरक्षा प्रणाली अधिक मजबूत होणार आहे.

कोणत्या कंपन्यांना दिले काम?

या प्रकल्पात अनंत टेक्नॉलॉजीज, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स आणि अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीजयांना सामील करण्यात आले आहे. या तीनही कंपन्या इस्रोच्या (ISRO) दीर्घकालीन भागीदार असून, त्यांनी यापूर्वी चांद्रयान-३ (Chandrayaan-3) सारख्या मिशनमध्येही मोठे योगदान दिले आहे.

लवकरच होणार प्रक्षेपण?

अनंत टेक्नॉलॉजीज तयार करत असलेला उपग्रह याच वर्षी पूर्ण होण्याची शक्यता असून, त्याचे प्रक्षेपण इस्रोच्या एलव्हीएम-३ (LVM-3) रॉकेटमधून किंवा एलन मस्कच्या स्पेसएक्स (SpaceX) द्वारे होऊ शकते.

३ अब्ज डॉलर्सचा SBS-3 कार्यक्रम

या उपग्रह प्रकल्पाचा भाग ‘स्पेस-बेस्ड सर्व्हिलन्स-३’ (SBS-3 Program) या ३ अब्ज डॉलर्सच्या योजनेंतर्गत आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) या योजनेला मंजुरी दिली होती. यामध्ये एकूण ५२ पाळत ठेवणारे उपग्रह बनवले जाणार असून त्यापैकी ३१ खासगी कंपन्या बनवतील व उर्वरित उपग्रह इस्रोद्वारे तयार होतील.

अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज, जी २०१९ मध्ये अदानी डिफेन्स अँड एयरोस्पेसने विकत घेतली, ही कंपनी NavIC सॅटेलाइट सिस्टीमच्या विकासातही सहभागी आहे – जी भारताची स्वदेशी GPS प्रणाली आहे. भारताने पाकस्थित दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर खासगी कंपन्यांना तातडीने या उपग्रहांची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत.

Share:

More Posts