India Pakistan Conflict: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी पहिल्यांदाच भारताने ऑपरेशन सिंदरदरम्यान तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी नाकारली होती, असे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार आपण भारत-पाकमधील संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा दावा केला होता.
मात्र, आता थेट पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनीच भारताने तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला सहमती दिली नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे. यामुळे एकप्रकारे ट्रम्प यांचे खोटेपण उघडे झाले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री काय म्हणाले?
‘अल जझीरा’ला दिलेल्या मुलाखतीत दार म्हणाले की, “भारत कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता.” ते म्हणाले, “आम्हाला तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप मान्य आहे, पण भारताने ते स्पष्टपणे द्विपक्षीय प्रकरण असल्याचे म्हटले आहे.”
दार यांनी खुलासा केला की, अमेरिकेमार्फत त्यांना युद्धविरामाची ऑफर मिळाली होती आणि एका तटस्थ ठिकाणी भारत-पाकिस्तान चर्चा होईल अशीही सूचना होती. पण जेव्हा त्यांनी 25 जुलै रोजी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेऊन ट्रम्प यांच्या मध्यस्थीबद्दल विचारले, तेव्हा रुबिओ यांनी भारत त्याला द्विपक्षीय मुद्दा मानत असल्याचे सांगितले.
दार म्हणाले की, “चर्चेसाठी दोनही पक्षांची तयारी असावी लागते. जोपर्यंत भारताची इच्छा नसेल, तोपर्यंत आम्ही चर्चेसाठी दबाव आणू शकत नाही.”
ट्रम्प यांचा वारंवार दावा
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवस चाललेल्या हल्ल्यांनंतर ट्रम्प यांनी युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला होता. 10 मे रोजी त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वर जाहीर केले होते की, “अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने त्वरित आणि पूर्ण युद्धविरामास सहमती दिली आहे.” त्यानंतरही त्यांनी अनेकदा सांगितले की, त्यांनी व्यापार थांबवण्याची धमकी देऊन दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घडवून आणला.
भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट
ट्रम्प यांच्या दाव्याच्या उलट, भारताने नेहमीच कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला नकार दिला. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, पाकिस्तानच्या लष्करी संचालनालयाने (डीजीएमओ) भारतीय डीजीएमओला फोन करून शांततेची विनंती केली होती. त्यानंतरच दोन्ही देशांनी जमिनीवरून आणि हवाई हल्ले थांबवण्याचे ठरवले.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही ही सहमती द्विपक्षीय असल्याचे म्हटले होते. 1971 च्या सिमला करारानंतर भारत नेहमीच पाकिस्तानसोबतचे सर्व प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्याचा आग्रह धरत आहे. पंतप्रधान मोदींनीही स्पष्ट केले होते की, पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा केवळ दहशतवादावरच होईल.
हे देखील वाचा – ‘माझे मित्र नरेंद्र मोदी’; ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, ‘या’ मुद्द्यांवर झाली महत्त्वाची चर्चा