PM Modi – Donald Trump Talk | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून ऑपरेशन सिंदूर व काश्मीरच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरच्या मुद्यावर भारत कधीही कोणाची मध्यस्थी स्विकारणार नसल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी बोलताना स्पष्ट केले.
भारताने जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पाकिस्तानच्या अवैध ताब्याचा मुद्दा सोडवण्यासाठी कधीही तृतीय पक्ष मध्यस्थी मागितली नाही आणि ती स्वीकारणारही नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत ठामपणे सांगितले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या संभाषणाची माहिती दिली. पंतप्रधान मोदी कॅनडामधील जी7 परिषदेत (G7 Summit) सहभागी असताना हा संवाद झाला. ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत (Operation Sindoor) तपशील विचारल्यानंतर हा विषय चर्चेत आला. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. मिस्री यांनी सांगितलं की, ट्रम्प यांच्या विनंतीवरून हा फोन कॉल झाला, कारण जी7 परिषदेत समोरासमोर भेट होऊ शकली नाही.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताची यशस्वी लष्करी प्रत्युत्तर होते. मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितलं की, भारताची कारवाई नियंत्रि होती आणि ती फक्त पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांनालक्ष्य करणारी होती. त्यांनी स्पष्ट केलं की, भारताला मध्यस्थी नको आहे आणि यावर देशात पूर्ण राजकीय एकमत आहे.
दरम्यान, याआधी ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या युद्धविरामाचं श्रेय घेतलं होतं, ज्याचा भारताने ठाम नकार दिला. तसंच, ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीची ऑफर दिली होती.
तसेच, ट्रम्प यांनी भारताच्या प्रयत्नांचं कौतुक करून मोदींना अमेरिका भेटीचं (US Visit) निमंत्रण दिले होते, पण पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मोदींनी ते नाकारलं.