Pakistan Flood Emergency: पाकिस्तानला पाण्याने घेरलं! PoK मध्ये पूरस्थिती, आणीबाणी लागू; पाकने भारतावर केले आरोप

Pakistan Flood Emergency

Pakistan Flood Emergency | पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने सिंधू जल करार स्थगिती करण्याची घोषणा (Indus Waters Treaty Suspension) केल्यानंतर, आता पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला आहे की, भारताने अचानक झेलम नदीतून (Jhelum River) मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे.

पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनुसार, भारताने पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये झेलम नदीचे पाणी सोडल्यानंतर मुजफ्फराबादमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागात आणीबाणी (Emergency in Muzaffarabad) जाहीर करण्यात आली आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी आरोप केला की, भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता झेलममध्ये पाणी सोडले, ज्यामुळे मुजफ्फराबादजवळ पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. स्थानिक प्रशासनाने हट्टियन बाला परिसरात जल आपत्कालीन स्थिती लागू केली असून, मशिदींमधून सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत.

झेलममधून आलेले पाणी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातून पुढे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या चकोठी भागात वाढले आहे, असेही वृत्तात म्हटले आहे. सिंधू जल करार (Indus Waters Treaty) निलंबित केल्यानंतर भारताने हा पाऊल उचलल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांनी याला “आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि जल करारांचे पूर्ण उल्लंघन” असे संबोधले आहे.

दरम्यान, भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांकडून झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात उचलले आहे. भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला “विश्वसनीय आणि अपरिवर्तनीय” पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत सिंधू जल कराराचा प्रभाव निलंबित राहणार आहे.