India Pakistan UN : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानने पुन्हा एकदा शांतता आणि स्थैर्याचा उल्लेख करत जम्मू-काश्मीरवर दावा ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने नेहमीप्रमाणेच पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे नेहमीच भारताचा भाग होते व राहतील, असे स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) भारताचे राजदूत हरीश परवथानेनी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि अभिन्न अंग आहेत. ते यापूर्वीही भारताचा भाग होते आणि नेहमीच राहतील.”
सिंधू जल करार स्थगित करण्यामागे दहशतवाद
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये केवळ सिंधू जल करार (IWT) स्थगित करण्याचे कारण स्पष्ट केले नाही, तर पाकिस्तानला ‘दहशतवादाचे जागतिक केंद्र’ असे संबोधले.
हरीश परवथानेनी म्हणाले की, भारत गेल्या 65 वर्षांपासून मैत्री आणि सद्भावनेमुळे सिंधू जल कराराचे पालन करत होता. मात्र, याच काळात पाकिस्तानने भारतावर तीन युद्धे लादली आणि हजारो दहशतवादी हल्ले घडवून आणले, ज्यामुळे या कराराच्या भावनेचा भंग झाला.
पाकिस्तानने पाठिंबा दिलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शेकडो भारतीय नागरिकांचा बळी गेला आहे. याच वर्षाच्या एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख त्यांनी केला, ज्यात 1 परदेशी नागरिकांसह 26 लोकांना प्राण गमवावे लागले होते.
भारत दहशतवादाचे जागतिक केंद्र असलेल्या पाकिस्तानसोबतचा हा करार स्थगित करत असल्याची घोषणा त्यांनी केली. जोपर्यंत पाकिस्तानच्या भूमीतून पोसलेला दहशतवाद पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत हा करार स्थगित राहील.
पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणावर टीका
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला त्यांच्या देशातील अंतर्गत परिस्थितीवरही आरसा दाखवला. भारताने म्हटले की, पाकिस्तानने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकले. त्यांच्या पक्षावर (पीटीआय) बंदी घालण्यात आली आणि 27 व्या संविधान सुधारणेद्वारे सेनाप्रमुख आसिम मुनीर यांना आजीवन संरक्षण देण्यात आले, जी एक प्रकारे संविधानिक सत्तापालट आहे.
हे देखील वाचा – Gold Silver Prices : सोनं आणि चांदीच्या किंमती एवढ्या का वाढल्या? सरकारने सांगितले विक्रमी भाववाढीचे मुख्य कारण









