रशियाकडून तेलाच्या खरेदीवरून ट्रम्प यांचे भारतावर टीकास्त्र, आता भारताने अमेरिकेला दिले सडेतोड प्रत्युत्तर

India response to Trump tariff threat

India response to Trump tariff threat: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियन तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर पुन्हा एकदा टीका केली आहे. ट्रम्प यांनी भारताने रशियकडून तेल आणि लष्करी उत्पादने खरेदी करणे सुरू ठेवल्यास पुन्हा एकदा अधिक शुल्क (Tariff) लावण्याचा इशारा दिला.

यावर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र शब्दांत निवेदन जारी करून अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. (India response to Trump tariff threat)

परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “युक्रेनमधील संघर्षानंतर रशियाकडून तेल आयात केल्यामुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनने (EU) भारताला लक्ष्य केले आहे. परंतु, प्रत्यक्षात युक्रेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यावर युरोपकडे पारंपरिक तेल पुरवठा वळवण्यात आला. त्यामुळे भारताने रशियाकडून आयात सुरू केली. त्यावेळी, जागतिक ऊर्जा बाजारातील स्थिरता वाढवण्यासाठी अमेरिकेनेच भारताला अशा आयातीसाठी प्रोत्साहन दिले होते.”

परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात काय म्हटले आहे?

परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे आहे की, भारतीय नागरिकांसाठी ऊर्जा खर्च परवडणारा आणि स्थिर ठेवण्यासाठी भारताची रशियाकडून होणारी आयात आवश्यक आहे. ही गरज जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे.

भारतावर टीका करणारे देश स्वतः रशियासोबत मोठ्या प्रमाणावर व्यापार करत आहेत. युरोपियन युनियनने 2024 मध्ये रशियासोबत 67.5 अब्ज युरोचा वस्तूंचा व्यापार केला, जो भारताच्या एकूण व्यापारापेक्षा खूप जास्त आहे, असे सडेतोड उत्तर सरकारने दिले आहे.

तसेच, भारताने पुढे म्हटले की, अमेरिका स्वतः आपल्या अणुऊर्जा उद्योगासाठी रशियाकडून युरेनियम हेक्साफ्लोराईड, इलेक्ट्रिक वाहनांसाठी पॅलॅडियम आणि इतर रासायनिक उत्पादने आयात करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारताला लक्ष्य करणे अवाजवी आणि अन्यायकारक आहे. कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणे, भारत आपल्या राष्ट्रीय हिताचे आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल, असे भारताने स्पष्ट केले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा:

डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून भारतावर 25 टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली होती. अमेरिकेच्या मते, भारत अमेरिकेच्या उत्पादनांवर ‘जगातील सर्वाधिक’ शुल्क लावतो, त्यामुळे हे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी आणि ‘ब्रिक्स’ (BRICS) गटात भारताचा सहभाग यालाही शुल्क वाढवण्याचे कारण दिले आहे, कारण त्यांना ब्रिक्स ‘अमेरिका विरोधी’ गट वाटतो.

भारत रशियाकडून तेल खरेदी करून बराचसा भाग नफ्याच्या बदल्यात खुल्या बाजारात विकत असल्याचे देखील ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आयात शुल्क वाढवण्याचा इशारा दिला आहे.