India Warns Pakistan | पाकिस्तानकडून भविष्यात होणारे कोणतेही दहशतवादी कृत्य युद्धाचा (Act of War) भाग मानले जाईल आणि भारत त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यााबाबत उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्टपणे सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने उत्तर भारतातील लष्करी तळ आणि नागरी वस्त्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताकडून हा निर्णय घेतला आहे. बॉम्बस्फोट, गोळीबार, विमान अपहरण आणि सायबर, जैविक किंवा रासायनिक हल्ल्यांसारख्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला युद्धाची घोषणा मानली जाईल. यात सरकारी इमारती, लष्करी तळ आणि संस्थांवरील हल्ल्यांचा समावेश असेल.
दोन आठवड्यांपूर्वी पाकिस्तानशी संबंधित दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता सीमापार दहशतवादाशी संबंधित धोक्यांविरुद्धच्या कारवाईसाठी सरकारने ठाम भूमिका घेतली आहे.
या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील (PoJK) दहशतवादी तळांवर अचूक क्रूझ क्षेपणास्त्रांचे हल्ले केले. यानंतर, पाकिस्तानने, जिथे लष्कराचा नागरी सरकारवर मोठा प्रभाव आहे, ड्रोनद्वारे भारतातील नागरी क्षेत्रांवर हल्ला करून परिस्थिती अधिक चिघळवली.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांच्या बचावासाठी ७ मे रोजी पाकिस्तानी लष्कर उभे राहिल्याने, भारतावर हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांना मदत करण्याची पाकिस्तानी लष्कराची भूमिका अधिक स्पष्ट झाली.
भारतीय लष्कर आणि गुप्तचर सूत्रांनी निर्विवाद पुरावे सादर केले आहेत की पाकिस्तान लष्करातील काही घटक, विशेषतः ISI संबंधित अधिकारी, PoJK मध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांना लॉजिस्टिक मदत, सुरक्षित आश्रयस्थान, प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ पुरवत आहेत. काही दहशतवादी तळ ज्ञात लष्करी आस्थापना आणि छावण्यांच्या अगदी जवळ असल्याने, त्यांना हेतुपुरस्सरपणे संरक्षण दिले जात असल्याचा संशय अधिक दृढ झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले.