ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानचे मोठे नुकसान; भारताने 6 विमाने पाडली; भारतीय हवाई दल प्रमुखांचा खुलासा

India Pakistan Conflict

India Pakistan Conflict: भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्याचा खुलासा वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी केला आहे. या संघर्षादरम्यान पाकिस्तानची (India Pakistan Conflict) 5 फायटर जेट पाडल्याची माहिती त्यांनी दिली.

22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवादी तळांना लक्ष्य करून हे ऑपरेशन (Operation Sindoor) सुरू करण्यात आले होते.

बंगळूर येथे एका कार्यक्रमात बोलताना वायुदल प्रमुखांनी सांगितले की, ही विमाने एस-400 हवाई संरक्षण प्रणालीनेपाडली. पाच फायटर जेट व्यतिरिक्त एक मोठे एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल विमानही नष्ट करण्यात आले.

“आम्ही किमान पाच फायटर जेट पाडल्याची आणि सुमारे 300 किलोमीटर अंतरावरून एक मोठे विमान पाडल्याची पुष्टी करतो,” असे सांगत त्यांनी याला आतापर्यंतचे सर्वात मोठे ‘सरफेस-टू-एअर’ यश म्हटले आहे.

पाकिस्तानी हवाई दलाचे मोठे नुकसान

ऑपरेशन सिंदूर 7 मे रोजी सुरू झाले. त्यानंतर भारताने काही पाकिस्तानी हवाई दलाची अत्याधुनिक विमाने पाडल्याचे म्हटले होते, पण नेमकी संख्या सांगितली नव्हती. त्यावेळी एअर मार्शल एके भारती यांनी सांगितले होते की, भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापासून पाकिस्तानी विमानांना रोखण्यात आले. त्यांचे अवशेष आपल्या हद्दीत नसल्यामुळे नेमकी संख्या सांगणे कठीण आहे, पण आम्ही काही विमाने पाडली आहेत.

एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी सांगितले की, या हल्ल्यात पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीचे इतके मोठे नुकसान झाले की, त्यांना समजले की संघर्ष पुढे चालू ठेवल्यास त्यांना आणखी मोठे नुकसान होईल. “80 ते 90 तासांच्या युद्धात आम्ही त्यांच्या हवाई प्रणालीचे मोठे नुकसान केले,” असे ते म्हणाले.

F-16 हँगरलाही लक्ष्य

शाहबाज जेकबाबाद हवाई तळावरील F-16 हँगरचा अर्धा भाग नष्ट झाला असून, आत असलेली काही विमानेही खराब झाली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच, या ऑपरेशनदरम्यान भारताने मुरीद आणि चाकलालासारख्या दोन कमांड अँड कंट्रोल सेंटर्सवरही नियंत्रण मिळवले.