MiG-21 Fighter Jets: भारतीय हवाई दलातून मिग-21 होणार निवृत्त, ‘हे ‘लढाऊ विमान घेणार जागा

MiG-21 Fighter Jets

 MiG-21 Fighter Jets: भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) मिग-21 लढाऊ विमानांचा (MiG-21 Fighter Jets) सेवाकाळ सप्टेंबर 2025 मध्ये संपवण्याचा निर्णय घेतला असून, टप्प्याटप्प्याने ही विमाने सेवेतून बाहेर काढली जातील.

तब्बल 62 वर्षे देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या विमानांची जागा आता तेजस मार्क 1ए या स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टने घेणार आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

सध्या मिग-21 वापरणारे स्क्वाड्रन राजस्थानमधील नाल हवाई दलाच्या तळावर तैनात आहेत. एक वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की “भारतीय हवाई दल या वर्षी सप्टेंबरपर्यंत मिग-21 विमाने पूर्णपणे वापरातून काढून टाकणार आहे. त्यांच्या जागी तेजस मार्क 1ए ही विमाने दाखल होतील.”

मिग-21 चा इतिहास

मिग-21 हे भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान होते. 1963 मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनकडून भारताने ही विमाने खरेदी केली होती. यानंतर 1965 च्या भारत-पाक युद्धात त्यांचा काही प्रमाणात वापर झाला. मात्र, 1971 मधील बांगलादेश मुक्ती संग्राम, 1999 चे कारगिल युद्ध आणि 2019 च्या बालाकोट हवाई कारवाईत मिग-21 ने आपले सामर्थ्य सिद्ध केले.

मिग-21 विमानांचे अनेक वैमानिक आणि स्क्वाड्रनसाठी ते भावनिकदृष्ट्या जिव्हाळ्याचे होते. ऑक्टोबर 2023 मध्ये, राजस्थानातील उत्तरलाई हवाई तळावरून ऑपरेट करणाऱ्या ‘ओरिअल्स’ नावाच्या नंबर 4 स्क्वाड्रनने मिग-21 विमानांचा निरोप घेतला. या स्क्वाड्रनने 1966 पासून मिग-21 विमाने वापरली होती.

दरम्यान, तेजस मार्क 1ए विमानांची निर्मिती जलद गतीने सुरू आहे. जुलै 2025 मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, तेजससाठी पंखांचे पहिले संच लार्सन अँड टुब्रोकडून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला पाठवले गेले.

भारताची हवाई क्षमता अधिक मजबूत आणि स्वदेशी बनवण्याच्या दिशेने हा टप्पा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तेजस लढाऊ विमानांच्या समावेशामुळे हवाई दलाची ताकद अधिक शास्त्रीय आणि आधुनिक होणार आहे.