भारतीय सैन्यात आता दोन खास उंटांचा समावेश, ‘या’ कामासाठी होणार उपयोग

Bactrian Camels in Indian Army

Bactrian Camels in Indian Army: भारतीय सैन्यात आता दोन खास उंटाचां समावेश करण्यात आला आहे. अनेक दशकांच्या चाचणीनंतर भारतीय लष्कराने आता लडाखमध्ये आढळणाऱ्या बॅक्ट्रियन उंटांना (Bactrian camels) अधिकृतपणे सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हे दोन कुबड्यांचे उंट (Double-humped camels) लडाखच्या दुर्गम आणि अतिउंच भागांमध्ये गस्त घालण्यासाठी आणि सामान वाहून नेण्यासाठी वापरले जाणार आहेत. याबाबत द ट्रिब्यूनने उत्तर दिले आहे.

काही आठवड्यांपूर्वीच, लेहमधील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अल्टिट्यूड रिसर्च (DIHAR) या संस्थेने 14 प्रशिक्षित बॅक्ट्रियन उंट आणि त्यांच्या प्रशिक्षणाचे आणि व्यवस्थापनाचे नियम लष्कराच्या 14 कॉर्प्सकडे सुपूर्द केले आहेत. भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) देखील या उंटांच्या वापराचा विचार करत आहेत.

दुर्गम भागासाठी उंट उपयुक्त

लडाखमध्ये रस्त्यांचे मोठे जाळे विकसित झाले असले, तरी काही दूरच्या चौक्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही प्राण्यांचा वापर केला जातो. ड्रोन आणि यांत्रिक खेचरे सुद्धा लॉजिस्टिक्ससाठी वापरली जात आहेत, पण अतिउंच भागात हवामान आणि दृश्यमानतेमुळे त्यांच्या वापरावर मर्यादा येतात.

लष्कराच्या मागणीनुसार, 2016 मध्ये डिआरडीओ (DRDO) च्या ‘DIHAR’ संस्थेने बॅक्ट्रियन उंटांच्या वापरासाठी संशोधन सुरू केले. या संशोधनात उंटांच्या शारीरिक मोजमाप, वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भार वाहून नेण्याची क्षमता तपासली गेली. त्यांना गोळीबाराचे आणि स्फोटांचे आवाज ऐकल्यावर घाबरून न जाण्याचे प्रशिक्षणही दिले गेले.

लष्कराच्या तुलनेसाठी, राजस्थानमधून तीन वाळवंटी उंट लेहमध्ये आणले होते. हे बॅक्ट्रियन उंट मध्य आशियाचे मूळ रहिवासी आहेत आणि एकेकाळी सिल्क रूटच्या व्यापारासाठी वापरले जायचे. सध्या हे उंट लडाखमधील नुब्रा खोऱ्यात पर्यटकांसाठी वापरले जातात.