शौर्याचे कौतुक! ऑपरेशन सिंदूर’ वेळी 10 वर्षांच्या मुलाने केली सैनिकांची मदत, आता लष्कराने घेतला मोठा निर्णय

Indian Army

Indian Army: भारतीय लष्कराच्या (Indian Army) वेस्टर्न कमांडने एक अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) दरम्यान सीमेवर तैनात असलेल्या जवानांना दूध, लस्सी, चहा आणि बर्फ पुरवणाऱ्या फिरोजपूरच्या एका 10 वर्षांच्या बालकाचे संपूर्ण शिक्षण खर्च आता लष्कर (Indian Army) उचलणार आहे.

पंजाबच्या सीमेलगत असलेल्या फिरोजपूर जिल्ह्यातील एका छोट्या गावातून असलेल्या १० वर्षांच्या शवन सिंह (स्वर्ण सिंग) या मुलाने आपल्या धैर्याने संपूर्ण लष्कराचं मन जिंकले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय जवानांना चहा, दूध आणि बर्फ पुरवणाऱ्या या लहानग्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आता भारतीय लष्कर उचलणार आहे.

फिरोजपूर छावणीत नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष समारंभात वेस्टर्न कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांच्या हस्ते स्वर्ण सिंगचा सत्कार करण्यात आला. स्वर्णच्या धैर्याचे आणि सेवा वृत्तीचे कौतुक करताना लष्कराने स्पष्ट केले की, जवानांच्या सेवेसोबतच देशाच्या भावी पिढीकडे लक्ष देणं ही देखील त्यांचीच जबाबदारी आहे.

सीमारेषेवरचा ‘लहान योद्धा’

मे 2025 मध्ये भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील तारा वाली गावात तणावाचे वातावरण होते. अशा कठीण काळात स्वर्ण सिंग या चौथीतील विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबाच्या शेताजवळ तैनात असलेल्या लष्करी जवानांना रोज दूध, लस्सी, पाणी, चहा आणि बर्फ पुरवले.

या धाडसाची दखल घेत ७ व्या इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल रणजीत सिंग मनराल यांच्या हस्ते स्वर्णचा ‘सर्वात तरुण नागरी योद्धा’ म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी त्याला स्मृतीचिन्ह, खास जेवण आणि आवडते आईस्क्रीम देण्यात आले.

“मोठं झाल्यावर मी सैनिकच होणार!”

स्वतः स्वर्ण सिंगने आनंद व्यक्त करत म्हटले, “मी घाबरलो नव्हतो. मला मोठं झाल्यावर सैनिकच व्हायचं आहे.” त्याचे वडील सोना सिंग आणि आई संतोष राणी यांनी सांगितले, “त्याचं जवानांशी नातं खूप आपुलकीचं होतं. ते त्याला बिस्किटं, जेवण देत आणि प्रेम करत.”

भारतीय लष्कराने जाहीर केले की, गोल्डन ॲरो डिव्हिजन स्वर्णच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. त्याच्या प्रवेशापासून शैक्षणिक गरजांपर्यंत सर्व बाबींमध्ये त्याला आवश्यक ते मार्गदर्शन व सुविधा पुरवल्या जातील, जेणेकरून तो आपल्या स्वप्नाच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकेल.