Indian Student Deportation | अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून परदेशी विद्यार्थ्यांविरोधात आक्रमक धोरण राबवले जात आहे. भारतासह अनेक देशातील नागरिकांवर कारवाई करत त्यांना मायदेशी पाठवले जात आहे. अशीच एक घटना अमेरिकेतील न्यू जर्सी (New Jersey) येथील नेवार्क विमानतळावर घडली असून, येथे एका भारतीय तरुणाला अमानुष वागणूक दिल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमेरिकेतील न्यू जर्सी येथील नेवार्क विमानतळावर एका भारतीय तरुणाला हातकड्या घालून आणि जमिनीवर पाडूनअटक करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर भारतीय समुदायात संतापाची लाट उसळली असून, ही कृती अमानुष आणि मानवतेविरुद्धची असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि हेल्थबॉट्स एआय कंपनीचे अध्यक्ष कुणाल जैन यांनी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत संताप व्यक्त केला. त्यांनी वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासालाया प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.
I witnessed a young Indian student being deported from Newark Airport last night— handcuffed, crying, treated like a criminal. He came chasing dreams, not causing harm. As an NRI, I felt helpless and heartbroken. This is a human tragedy. @IndianEmbassyUS #immigrationraids pic.twitter.com/0cINhd0xU1
— Kunal Jain (@SONOFINDIA) June 8, 2025
कुणाल जैन यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर लिहिले की, “नेवार्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला डिपोर्ट करण्यात आले. त्याला गुन्हेगारासारखे वागवले गेले. तो फक्त आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत आला होता, नुकसान करण्यासाठी नव्हे.” त्यांनी या घटनेला ‘मानवी शोकांतिका’ असे संबोधले.
व्हिडिओ आणि फोटोंमध्ये तरुण भावनिक अवस्थेत रडताना, जमिनीवर पडलेला आणि एका पोलीस अधिकाऱ्याच्या ताब्यात असल्याचे दिसते. कुणाल जैन यांच्या मते, या तरुणाने हरियाणवी भाषेत संवाद साधला होता. त्यांनी असा आरोप केला की, हे प्रकरण केवळ एकटे नाही. “प्रत्येक दिवशी 3-4 भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा असूनही इमिग्रेशनच्या चौकशीमध्ये गुंतवले जाते आणि समाधानकारक उत्तरं न दिल्यास डिपोर्ट केलं जातं,” असे त्यांनी लिहिले.
या घटनेमुळे भारतीय डायस्पोरा मध्ये तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही यूजर्सने परराष्ट्रमंत्री स. जयशंकर यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.