‘द शॅडो’ संपला! गाझातील हमासचा प्रमुख मोहम्मद सिनवार ठार, इस्त्रायलच्या पंतप्रधानांची माहिती

Hamas Gaza chief Mohammad Sinwar killed

Hamas Gaza chief Mohammad Sinwar killed | इस्त्रायलने गाझा पट्टीतील (Gaza Strip) हमासचा (Hamas) वरिष्ठ नेता आणि माजी प्रमुख याह्या सिनवारचा भाऊ मोहम्मद सिनवार (Mohammed Sinwar) याला ठार केले आहे. इस्रायली सैन्याने केलेल्या कारवाईत मोहम्मद सिनवार मारला गेला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी संसदेत बोलतानायाबाबत माहिती दिली.

“आम्ही मोहम्मद सिनवारला संपवले,” असा स्पष्ट दावा करत नेतन्याहू यांनी हमासविरोधातील कारवाईतील मोठ्या टप्प्याची घोषणा केली. याआधी इस्रायली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण गाझा परिसरातील हवाई हल्ल्यात मोहम्मद सिनवारला लक्ष्य करण्यात आले होते.

मोहम्मद सिनवारचा मृतदेह इस्रायल डिफेन्स फोर्सेसने केलेल्या बोगद्यात आढळून आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्रायल कॅट्झ यांनी संसदेमधील बंद बैठकीत सांगितले की, “खान युनिसमधील (Khan Younis) युरोपियन हॉस्पिटल (European Hospital) परिसरात झालेल्या हल्ल्यात सिनवार ठार झाला, असे सर्व पुरावे दर्शवतात.”

कोण होता मोहम्मद सिनवार?

1975 मध्ये खान युनिसच्या एका शरणार्थी छावणीत जन्मलेला मोहम्मद इब्राहिम हसन सिनवार (Muhammad Ibrahim Hassan Sinwar) अनेक वर्षे हमासमध्ये हळूहळू वरच्या पदांवर पोहोचला. त्याच्या गुप्तचर कार्यपद्धतीमुळे इस्रायली अधिकाऱ्यांमध्ये त्याला “द शॅडो” या टोपणनावाने ओळखले जायचे.

तो हमासचा महत्त्वाचा रणनीतिकार आणि लष्करी कमांडर म्हणून ओळखला जात होता. 2006 मध्ये इस्रायली सैनिक गिलाड शालितच्या अपहरणात त्याने मुख्य भूमिका बजावली होती. या घटनेमुळेच पुढे 2011 मध्ये एक मोठा कैदी विनिमय करार झाला होता.

ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलवर हमासने केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर, मोहम्मद सिनवारने हमासचे नेतृत्व हाती घेतले. त्याच्या नेतृत्त्वात हमासने इस्रायलच्या लष्करी दबावाखालीही भरती वाढवली आणि हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढवली होती.