Israel Support To India’s Fight Against Terrorism | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळं उद्धवस्त केली होती. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली होती. दहशतवाद्यांविरोधातील भारताच्या या कारवाईला इस्त्रायलने पूर्ण पाठिंबा दिला आहे.
इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल (निवृत्त) अमीर बारम यांनी भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह (यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादात बारम यांनी भारताच्या “दहशतवादाविरुद्धच्या न्याय्य लढ्याला” इस्त्रायलचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले आणि “ऑपरेशन सिंदूर”च्या (Operation Sindoor) अचूकतेचे आणि प्रभावीपणाचे विशेष कौतुक केले.
दोन्ही अधिकाऱ्यांनी भारत-इस्त्रायल संरक्षण सहकार्य (India-Israel defence cooperation) अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि धोरणात्मक सहकार्याचा “भविष्यातील रोडमॅप” तयार करण्यावर चर्चा केली.
DG, Israel Ministry of Defence Maj Gen (Res) Amir Baram today spoke with Defence Secretary Shri Rajesh Kumar Singh, extending Israel’s full support to India’s rightful fight against terrorism while lauding the success of #OperationSindoor. Both sides reaffirmed their commitment…
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 15, 2025
भारतीय संरक्षण मंत्रालयाने ‘X’ वर केलेल्या पोस्टमध्ये या चर्चेची माहिती दिली. त्यांनी म्हटले, “इस्त्रायलने भारताच्या आत्मरक्षणाच्या अधिकाराला पाठिंबा दिला असून ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखवलेली कार्यक्षमता ही दहशतवादाविरुद्ध भारताच्या निर्धाराची ओळख आहे.”
7 मे रोजी, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी लक्ष्यांवर अचूक हल्ले केल्यानंतर, भारतातील इस्त्रायलचे राजदूत रुवेन अझर (Reuven Azar) यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले होते, “इस्त्रायल भारताच्या आत्मरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन करते. दहशतवाद्यांना हे समजायला हवे की निष्पाप लोकांविरुद्धच्या त्यांच्या घृणास्पद गुन्ह्यांपासून लपायला जागा नाही.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही लष्करी मोहीम भारताने 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) TRF या गटाने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरू केली. त्या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला होता. 7 मे रोजी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले.