अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध, एस. जयशंकर यांची तालिबानशी पहिल्यांदाच थेट चर्चा

Jaishankar speaks with Taliban

Jaishankar speaks with Taliban | पहलगाम येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकस्थित दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताकडून पाकला सर्वच स्तरावर कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी तालिबान-शासित अफगाणिस्तानचे (Taliban-ruled Afghanistan) कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी (Amir Khan Muttaqi) यांच्याशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधला.

तालिबानने काबूलमध्ये सत्ता घेतल्यापासून 2021 नंतरचा हा दोन्ही देशांमधील राजकीय पातळीवरील पहिला थेट संपर्क ठरला आहे. जयशंकर यांनी अफगाण जनतेशी भारताचे पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंध (India-Afghanistan Relations) अधोरेखित करत त्यांच्या विकासात्मक गरजांमध्ये सहकार्याचे आश्वासन दिले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) निषेधाबद्दल जयशंकर यांनी मुत्ताकी यांचे आभार मानले. तसेच अफगाण-भारत संबंधांबाबत खोट्या बातम्या आणि गैरसमज पसरवण्याच्या प्रयत्नांचा मुत्ताकी यांनी केलेला निषेधही त्यांनी स्वागतार्ह असल्याचे सांगितले.

अफगाण परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, या संवादात द्विपक्षीय व्यापार, राजनैतिक संवाद वाढवणे, आणि भारतीय व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यासोबत भारतात असलेल्या अफगाण कैद्यांच्या सुटकेबाबत चर्चा झाली. मुत्ताकी यांनी चाबहार बंदराच्या (Chabahar Port) सहकार्यावरही भर दिला.

दोन्ही बाजूंनी अफगाण-भारत ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. भारताने अफगाणिस्तानातील विकास प्रकल्पांमध्ये पुन्हा सहभाग घेण्यास सकारात्मक भूमिका घेतल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. जयशंकर यांनी अफगाण नागरिकांसाठी व्हिसा आणि मानवी मदत अधिक सुलभ करण्याचे आश्वासन दिले.

या संवादाच्या पार्श्वभूमीवर, भारताने एप्रिलमध्ये एम. आनंद प्रकाश (M Anand Prakash) यांना काबूलला पाठवले होते. त्याआधीच तालिबान प्रशासनाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला होता. त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले, “अशा घटना प्रादेशिक स्थिरतेस धोका निर्माण करतात.”

जानेवारीमध्ये दुबईमध्ये झालेल्या संवादात विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी मुत्ताकी यांची भेट घेतली होती. या बैठकीत विकास, सुरक्षा, मानवतावादी मदत, निर्वासितांचे पुनर्वसन आणि दोन्ही देशांतील क्रिकेट संबंध यावर चर्चा झाली होती.