‘नरक आणि पाकिस्तान हे दोनच पर्याय असतील तर…’, जावेद अख्तर यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, व्हिडिओ व्हायरल

Javed Akhtar on Pakistan

Javed Akhtar on Pakistan | शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या हस्ते झाले. यावेळी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका करत, ‘नरक पत्करेन, पण पाकिस्तान नाही’ असे वक्तव्य केले.

“माझे ट्विटर पाहा, त्यावर खूप शिव्या देणारे आहेत, पण काही लोक माझी प्रशंसाही करतात. काही लोक म्हणतात की, तुम्ही काफिर आहात. काही लोक म्हणतात जिहादी, तू पाकिस्तानला जायला हवे. जर मला पाकिस्तान किंवा नरक यापैकी एक निवडण्याची संधी मिळाली तर मी नरकात जाणे पसंत करेन,” असे जावेद अख्तर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी संजय राऊत यांचे कौतुक करताना जावेद अख्तर म्हणाले, “संजय राऊत हे टी-२० खेळाडू आहेत. ते क्रिझबाहेर येतात आणि फक्त चौकार आणि षटकार मारतात. त्यांना बाद होण्याची चिंता नाही.”

जावेद अख्तर यांनी मुंबईविषयी बोलताना सांगितले की, “मी १९ वर्षांचा असताना मुंबईत आलो. आज जे काही आहे, जे काही घडलो आहे आणि मी जे काही मिळवलं ते मुंबई आणि महाराष्ट्राने दिलं आहे. हे ऋण मी सात जन्मातही फेडू शकत नाही.”

कट्टरपंथीयांच्या उपद्रवाची माहिती देताना जावेद अख्तर म्हणाले, “गेल्या ३० वर्षांत मला चार वेळा मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. त्यातील तीन वेळा मुल्लांनी दिलेल्या धमक्यांमुळे संरक्षण दिले गेले. मी कधीही संरक्षण मागितले नव्हते. रेकॉर्डिंग-शूटिंगवरून घरी आलो, तर पोलीस घरी बसलेले दिसायचे. ते कमिशनर साहेबांच्या आदेशावरून आल्याचे सांगायचे.”

दरम्यान, संजय राऊत यांना ईडीने (ED) अटक केल्यानंतर १०० हून अधिक दिवस तुरुंगात काढावे लागले होते. या अनुभवावर आधारित आणि त्यावेळच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देणारे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. या प्रकाशन सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले उपस्थित होते.