Devendra Fadnavis: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडले. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांना विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या विरोधाचा सामना करावा लागला.
या उद्घाटन कार्यक्रमावेळी विद्यापीठात डाव्या विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला जोरदार विरोध दर्शवला, ज्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विद्यार्थी संघटनांचा तीव्र निषेध
उद्घाटन कार्यक्रमाआधीच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि इतर डाव्या विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. “संघाचा प्रपोगंडा चालणार नाही” असे म्हणत विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. “त्यांच्या राजकारणामुळे समाजात तिरस्कार पसरतो आहे, त्यामुळे आम्ही निदर्शनं करत आहोत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या ठिकाणी तिरस्कार पसरवणाऱ्या आणि समाजात विष कालवणाऱ्या लोकांना स्थान नाही,” असे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांनी पुढे म्हटले की, “देवेंद्र फडणवीस समाजात तेढ निर्माण करत आहेत. कपडे बघून लोकांना ओळखा असे जर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे लोक सांगत असतील, हिंदी भाषा लादणार असतील तर आम्ही का गप्प बसायचे? आम्हाला इथे केंद्र सुरू करण्याबाबत काहीही म्हणणे नाही, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि त्यावर आमचा आक्षेप आहे.”
या सोहळ्यादरम्यान “देवेंद्र फडणवीस वापस जाओ” अशा घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या. महाराष्ट्रात परप्रांतीयांना मारहाण होत असताना मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन नको, अशी भूमिकाही काही विद्यार्थी संघटनांनी घेतली होती.
अध्यासन केंद्रांचा उद्देश आणि निधी
जवळपास 20 वर्षांनंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री आणि मराठी भाषा खात्याचे मंत्री उदय सामंत व संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.