मोदी त्यांचे बाप आहेत… भाजप अध्यक्षांच्या आदेशानंतर कंगना रणौतने डिलीट केले ट्रम्प यांच्यावरील ‘ते’ ट्विट

Kangana Ranaut

Kangana Ranaut | अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर केलेले वादग्रस्त ट्वीट डिलीट केले आहे. ट्रम्प यांनी भारत-पाक यांच्यात शस्त्रसंधीसाठी केलेल्या मध्यस्थीचा दावा, तसेच, भारतात अ‍ॅपलचे उत्पादन सुरू न करण्यासंदर्भातील वक्तव्यानंतर कंगनाने ट्विट केले होते. मात्र, भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांच्या सूचनेनंतर तिने हे ट्विट डिलीट केले.

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार असलेल्या रणौत यांनी अलीकडेच ट्रम्प यांच्या भारतातील अ‍ॅपल (Apple) विस्तारावरील टीकेवर प्रतिक्रिया देत एक कडवट ट्वीट केले होते. मोदींच्या जागतिक लोकप्रियतेवरून ट्रम्प यांना असुरक्षित वाटत असल्याचा टोला कंगनाने ट्विटमध्ये लगावला होता. या हटवलेल्या ट्वीटमध्ये कंगनाने विचारले होते, “हे जळणे आहे की राजनैतिक असुरक्षितता?”, आणि मोदींना “सर्व अल्फा पुरुषांचे जनक” असे म्हटले होते.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटले होते की, खरं तर, हे प्रेम कमी होण्यामागचं कारण काय असावं? ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष असले, तरी आजच्या घडीला जागतिक लोकप्रियतेच्या शर्यतीत आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्थान अधिक वरचं आहे. ट्रम्प यांची ही दुसरी टर्म असली, तरी मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले आहेत. ट्रम्प हे निश्चितच प्रभावशाली आणि प्रबळ नेता असतील, पण मोदी त्यांच्या एक पाऊल पुढे आहेत – अगदी त्यांचे बापच म्हणायला हरकत नाही. मग याला काय समजावं – ही जळणे आहे की राजनैतिक असुरक्षितता?

या ट्वीटनंतर काही तासांतच कंगनाने ही पोस्ट सोशल मीडियावरून हटवली. यामागचे कारण सांगत आणखी एका पोस्टमध्ये तिने लिहिले की, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी ती पोस्ट हटवण्यास सांगितले होते. त्या म्हणाल्या, “मी वैयक्तिक मत म्हणून ते पोस्ट केले होते, पण आता ते हटवले असून मला खेद आहे.” त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टही त्वरित डिलीट केल्याचे नमूद केले. कंगनाने ही पोस्ट डिलीट केली असली तरी या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले.