Attack on Kapil Sharma’s Canada cafe: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’वर (Kap’s Cafe) पुन्हा एकदा गोळीबार (Firing) झाला आहे. गेल्या एका महिन्यात त्यांच्या रेस्टॉरंटवर झालेला हा दुसरा हल्ला आहे.
या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर गोल्डी ढिल्लन याने घेतली असून, त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीशी (Lawrence Bishnoi gang) संबंध असल्याचा दावा केला आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
गोल्डी ढिल्लनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज कपिल शर्माच्या सरे येथील कॅप्स कॅफेवर जो गोळीबार झाला, त्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गोल्डी ढिल्लन घेतो. आम्ही त्याला फोन केला, पण त्याने प्रतिसाद दिला नाही, म्हणून आम्हाला ही कारवाई करावी लागली. जर त्याने अजूनही प्रतिसाद दिला नाही, तर लवकरच मुंबईत पुढील कारवाई केली जाईल.” या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, ही पोस्ट खरचं गोल्डी ढिल्लनने केली आहे का याची पुष्टी झालेली नाही.
काही दिवसांपूर्वीच या कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कॅफेवर गोळीबार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच ठिकाणी 10 जुलै रोजी अशाच प्रकारची घटना घडली होती. अनेक गोळ्यांमुळे कॅफेच्या खिडक्या आणि इमारतीचे नुकसान झाले, पण सुदैवाने आतील कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही दुखापत झाली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
यापूर्वी 9 जुलैच्या रात्रीदेखील याच कॅफेवर हल्ला झाला होता. तेव्हा खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डी याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) मोस्ट-वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत असलेल्या लड्डीचा संबंध बंदी घातलेल्या ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ (BKI) या संघटनेशी आहे.