Karachi Bakery Name Controversy | हैदराबादस्थित प्रसिद्ध भारतीय बेकरी ब्रँड कराची बेकरी (Karachi Bakery) पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी सापडली आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) कारवाईनंतर बेकरीचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. पाकिस्तानी शहराचे नाव धारण करू नये, असे मत काही जणांकडून व्यक्त केले जात आहे.
या विरोधानंतर, मालक राजेश आणि हरीश रामनानी यांनी बेकरीच्या नावाच्या उत्पत्तीबद्दल स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की त्यांचे आजोबा, खानचंद रामनानी (Khanchand Ramnani) यांनी 1947 च्या फाळणीनंतर भारतात स्थलांतर केल्यावर 1953 मध्ये कराची बेकरीची स्थापना केली. “73 वर्षे झाली आहेत. फाळणीनंतर भारतात आल्यामुळे आमच्या आजोबांनी कराचीवरून हे नाव ठेवले,” असे त्यांनी सांगितले.
बेकरीच्या मालकांनी प्रशासनाकडून मदतीची मागणी केली आणि त्यांची भारतीय ओळख अधोरेखित केली. “आम्ही मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नावात कोणताही बदल होऊ नये यासाठी मदत करण्याची विनंती करतो. शहरातील बेकरीच्या आऊटलेट्समध्ये लोक तिरंगा फडकवत आहेत,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे जोर देऊन सांगितले, “कृपया आमचे समर्थन करा, कारण आम्ही एक भारतीय ब्रँड आहोत, पाकिस्तानी नाही.”
कराची बेकरीचे प्रवर्तक राजेश रामनानी आणि हरीश रामनानी यांनी सांगितले की, कराची बेकरीची स्थापना 1953 मध्ये हैदराबादमध्ये त्यांचे आजोबा खानचंद रामनानी यांनी केली होती, जे फाळणीदरम्यान भारतात आले होते. विशाखापट्टणममधील एका गटाने कराची बेकरीचे नाव बदलण्याची मागणी करत केलेल्या अलीकडील विरोधाचा संदर्भ देत मालकांनी सांगितले की, लोक विरोध करत आहेत कारण याला पाकिस्तानमधील एका शहराचे नाव आहे, परंतु सत्य हे आहे की हा भारतातील हैदराबादचा ब्रँड आहे.
दरम्यान, कराची बेकरीला अशा विरोधाचा सामना करण्याची ही पहिली वेळ नाही. 2019 मध्ये, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर (Pulwama Terror Attack) बंगळूरुमधील एका आऊटलेटमध्ये कार्यकर्त्यांनी घुसून नाव बदलण्याची मागणी केली होती. बेकरीला त्यांच्या बोर्डावरील ‘कराची’ शब्द झाकण्यास आणि भारतीय ध्वज लावण्यास भाग पाडले होते. त्यावेळी बेकरीने एक निवेदन जारी करून त्यांची भारतीय ओळख स्पष्ट केली होती.
कराची बेकरी उस्मानियाआणि फ्रूट बिस्किटे यासाठी प्रसिद्ध आहे. या बेकरीने हैदराबाद, मुंबई, दिल्ली, बंगळूरु आणि इतर शहरांमध्ये आपला व्यवसाय वाढवला आहे.