Pahalgam terror attack : दहशतवाद्यांविरुद्ध काश्मीर एकवटले; पहलगाम हल्ल्याचा नागरिकांकडून तीव्र निषेध, अभूतपूर्व बंद

Pahalgam terror attack | जम्मू-काश्मीरमधील पलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यभर तीव्र संतापाचे लाट उसळली आहे. पहलगाम ते श्रीनगर, तसेच किश्तवाड ते डोडा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बंद, निषेध मोर्चे आणि शांतीदूत सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, पहलगाममध्ये सुमारे 800 स्थानिक नागरिक, पर्यटन व्यवसायिक आणि हॉटेल चालकांसह, फलक घेऊन रस्त्यावर उतरले. पहलगाम हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी स्पष्ट केलं, “हल्लेखोरांना हा संदेश द्यायचा आहे की अशा हिंसेला आम्ही पाठिंबा देणार नाही. आम्ही आमच्या पर्यटकांच्या पाठीशी आहोत.”

लाल चौक ते जामिया मशीदपर्यंत जनआक्रोश

श्रीनगरमधील लाल चौक येथील ऐतिहासिक घंटाघर (Clock Tower) निषेधाचं केंद्र ठरलं, जिथे राजकीय पक्ष, व्यापारी व नागरिक एकत्र आले. नौहट्टा येथील जामिया मशिदीबाहेर स्थानिकांनी मेणबत्त्या आणि फलक घेऊन शांततेच्या प्रतीकात्मक सभा घेतल्या.

राजकीय पक्षांचाही एकमुखी विरोध

नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, काँग्रेस व भाजप या पक्षांनी स्वतंत्रपणे निषेध मोर्चे काढले. काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या सदस्यांनीही लाल चौकातील निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. पर्यटकांच्या पलायनाची शक्यता लक्षात घेता, हॉटेल असोसिएशन्सनी पर्यटकांना ‘काश्मीर सोडू नका’ असा संदेश दिला.

जम्मूमध्ये एकजुटीचा संदेश

जम्मू विभागात धर्मनिरपेक्ष वातावरणात नागरिकांनी शांततापूर्ण निषेध नोंदवले. सरकारी कर्मचाऱ्यांनी 2 मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. किश्तवाड आणि डोडामध्ये, मुस्लिमबहुल भागात हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत मोर्चे निघाले.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा हल्ल्याला तीव्र विरोध

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत या हल्ल्याला “अमानुष आणि अर्थहीन क्रूरकर्म” असे संबोधले. त्यांनी जाहीर केलं की, मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख, आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदत केली जाईल. तसेच, पीडितांना त्यांच्या घरी सुखरूप परत पाठवण्याची जबाबदारी सरकार घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.