केरळमध्ये पावसामुळे निर्माणाधीन महामार्गाची दुरवस्था ! कोर्ट संतापले

तिरुअनंतपुरम – बांधकाम सुरू असलेल्या सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ची पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दुरवस्था झाल्याबद्दल केरळ उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. रस्त्याच्या कामासाठी नेमलेल्या ठेकेदारांची अशा स्वरुपाची मोठी बांधकामे करण्याची पात्रता आहे का याची खात्री करून घेतली होती का असा संतप्त सवाल न्यायालयाने महामार्ग प्राधिकरणाला विचारला.

त्याचबरोबर या महामार्गाच्या सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल पुढील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे आदेश प्राधिकरणाला दिले.
बांधकाम सुरू असलेल्या महामार्ग क्रमांक ६६ ची पावसात पार दुर्दशा झाली. अनेक ठिकाणी महामार्ग खचला, काही ठिकाणी रस्त्याला तडे गेले तर काही ठिकाणी रस्त्याचा भागच पावसात वाहून गेला .

हा मुद्दा प्रसिद्धी माध्यमांनी उचलून धरताच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेत हैदराबादस्थित केएनआर कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदार कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला.

दुसरीकडे महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अनेक याचिका केरळ उच्च न्यायालयात दाखल झाल्या. या याचिकांवर सुनावणीप्रसंगी न्यायालयाने अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.