Kerala Viral Video | केरळमधील (Kerala) कोची (Kochi) शहरात एका खाजगी मार्केटिंग कंपनीतील कर्मचाऱ्याच्या कथित छळाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये एका कर्मचाऱ्याच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला कुत्र्यासारखे फरफटत नेताना दिसत आहे. तसेच विक्रीचे लक्ष्य पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांना जमिनीवर पडलेली नाणी चाटायला लावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ स्थानिक वृत्तवाहिन्यांवर झळकताच कामगार विभाग (Labour Department) आणि मानवाधिकार आयोग (Human Rights Commission) यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. केरळचे कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी या दृश्यांना “धक्कादायक” आणि “अस्वीकार्य” म्हणत तातडीने तपास सुरू केला आहे.
मात्र, या व्हिडीओनंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनीच या आरोपांना खोटे ठरवत बचाव केला आहे. पोलिसांनीही व्हिडीओ दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरणाचं मूळ?
ही घटना पेरुंबवूर (Perumbavoor) येथील केल्ट्रा (Keltra) नावाच्या मार्केटिंग कंपनीत घडल्याचे सांगितले जात आहे. एका माजी व्यवस्थापकाने कंपनीतून वादानंतर प्रशिक्षणार्थींसह हा व्हिडीओ शूट केल्याची कबुली दिली आहे. तो केवळ “प्रशिक्षणाचा भाग” होता, असे त्याचे म्हणणे आहे.
पोलिसांकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नसली तरी राज्याच्या कामगार आणि युवा आयोगांनी स्वतंत्रपणे गुन्हे नोंदवले आहेत.
कर्मचाऱ्यांचं म्हणणं वेगळं
रिपोर्टनुसार, अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले की कंपनीत त्यांच्यावर कधीही छळ झाला नाही. एक महिला कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “माझा अनुभव चांगलाच आहे. मी येथे सुरक्षित आहे.” तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले की, “आमच्याकडे कोणतेही सेल्स टार्गेट नाही. आम्ही कमिशन बेसवर काम करतो.”
फरफटत नेण्यात आलेल्या व्यक्तीनेही कबूल केले की, व्हिडीओसाठी त्याने परवानगी दिली होती. काही कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर व्हिडीओ लीक केल्याचा आरोपही त्याने केला आहे.
सरकारने मागवला अहवाल
जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून चौकशी सुरू आहे. पोलिस आणि कामगार विभागाचा अहवाल आल्यानंतरच खरी माहिती स्पष्ट होईल.