Ram Sutar Passes Away : भारतीय शिल्पकलेचा एक दैदिप्यमान अध्याय आज संपला आहे. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे निर्माते आणि ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री उशिरा नोएडा येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी या दु:खद बातमीला दुजोरा दिला आहे. शिल्पकाम क्षेत्रात ६ दशकांहून अधिक काळ योगदान देणाऱ्या सुतार यांनी भारताच्या कलेला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले.
धुळ्याच्या गोणूर गावातून सुरू झालेला प्रवास
राम सुतार यांचा जन्म 1925 मध्ये महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोणूर या छोट्याशा गावात झाला. त्यांनी श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कलेचे धडे गिरवले. त्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून 1953 मध्ये त्यांनी पदविका प्राप्त केली. सुरुवातीला त्यांनी अजंठा-वेरूळ येथील पुरातत्व विभागात काम केले आणि त्यानंतर दिल्लीतील माहिती आणि प्रसारण मंत्रालयात आपली सेवा दिली. मात्र, केवळ शिल्पकलेला पूर्णवेळ वाहून घेण्यासाठी त्यांनी 1959 मध्ये सरकारी नोकरी सोडली.
राम सुतार यांच्या अजरामर कलाकृती:
- स्टॅच्यू ऑफ युनिटी (गुजरात): सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंच हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. 2018 मध्ये याचे उद्घाटन झाले होते.
- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक: संसदेच्या आवारातील घोड्यावर स्वार असलेले महाराज आणि मुंबईच्या किनारपट्टीवर नियोजित असलेल्या भव्य अश्वारूढ स्मारकाचे आरेखन त्यांनीच केले आहे.
- महात्मा गांधींचे पुतळे: संसदेतील ध्यानस्थ मुद्रेतील गांधीजींचा 17 फूट उंच पुतळा असो किंवा दिल्लीतील दांडी यात्रा स्मारक, सुतार यांनी गांधीजींचे जगभरात 200 हून अधिक पुतळे साकारले आहेत.
- चंबळ स्मारक (मध्य प्रदेश): गांधी सागर धरणावर असलेला 45 फुटी चंबळ देवीचा पुतळा ही त्यांच्या सुरुवातीच्या काळातील एक उत्कृष्ट कलाकृती मानली जाते.
- कृष्ण-अर्जुन रथ (कुरुक्षेत्र): महाभारतातील युद्धाचा प्रसंग सांगणारा 45 टन वजनाचा हा भव्य रथ 2008 मध्ये कुरुक्षेत्रातील ब्रह्म सरोवरावर स्थापित करण्यात आला.
पुरस्कार आणि गौरव
राम सुतार यांनी आपल्या कारकिर्दीत 8000 पेक्षा जास्त कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या या अभूतपूर्व योगदानासाठी भारत सरकारने त्यांना 1999 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच, याच वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने कला विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा – BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाची मोठी रणनीती; काँग्रेसची साथ सोडून ‘या’ पक्षासोबत जाणार?








