माजी सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांना लोकपालकडून क्लीन चिट! हिंडेनबर्गचे आरोप ठरले फोल

Lokpal Gives Clean Chit To Madhabi Puri Buch

Lokpal Gives Clean Chit To Madhabi Puri Buch | भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारींची चौकशी करणारी संस्था लोकपालने (Lokpal) भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांच्यावरील सर्व भ्रष्टाचाराच्या आरोपांना निराधार ठरवत क्लीन चिट दिली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) अहवालावर आणि काँग्रेस पक्षाच्या आरोपांवर आधारित तक्रारींवर विचार करताना लोकपालने स्पष्टपणे सांगितले की, हे आरोप तकलादू, आधारहीन आणि कायदेशीर दृष्टिकोनातून असमर्थनीय आहेत.

लोकपालच्या म्हणण्यानुसार, पुरावे व कायद्याच्या तत्त्वांनुसार कोणताही दखलपात्र गुन्हा किंवा चौकशीची गरज यामध्ये आढळून आली नाही.

ऑगस्ट 2024 मध्ये, अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) ने दावा केला होता की, काही व्हिसलब्लोअर कागदपत्रांनुसार बुच आणि त्यांच्या पतींचे ‘अदानी मनी सायफनिंग घोटाळ्यात’ वापरल्या गेलेल्या अज्ञात ऑफशोअर संस्थांमध्ये सहभाग होता. त्यानंतर काँग्रेसने हे प्रकरण अधिक उचलून धरत गंभीर आरोप मांडले.

काँग्रेसने आरोप केला होता की, बुच यांनी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्सच्या (REITs) प्रोत्साहनातून ब्लॅकस्टोन (Blackstone) या जागतिक गुंतवणूक कंपनीला फायदा करून दिला. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, बुच यांचे पती या कंपनीशी संबंधित असल्यामुळे, त्यांनी पदाचा करत गैरवापर केला.

दुसऱ्या आरोपात असा दावा करण्यात आला की, बुच यांनी ICICI बँकेत कार्यरत असताना मिळवलेले काही उत्पन्न योग्य पद्धतीने जाहीर केले नव्हते. मात्र चौकशीनंतर हे स्पष्ट झाले की, त्यांनी कोणतेही अवैध उत्पन्न लपवले नाही आणि त्यांच्या सर्व निवृत्ती लाभ कायदेशीर आणि उद्योगमान्य होते.

तिसरा मुद्दा सेबीमधील काही कर्मचाऱ्यांनी अर्थ मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रांमुळे उभा राहिला. त्यामध्ये बुच यांच्या नेतृत्वात अयोग्य कामाच्या संस्कृतीचा आरोप करण्यात आला होता. काही कर्मचाऱ्यांनी नावं घेणं, ओरडणं आणि व्यवस्थापनातील असंवेदनशीलता यावर नाराजी व्यक्त केली होती. सरकारने याप्रकरणी चौकशी केली आणि नंतर सेबी व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांशी संवेदनशीलतेने वागण्याचा सल्ला दिला. बुच यांनी राबवलेल्या आंतरिक सुधारणांमुळे काही गटांत असंतोष निर्माण झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, आता लोकपालने बुच यांना हिंडेनबर्ग प्रकरणात क्लिन चीट दिली आहे.