एअर इंडियाच्या विमानासारखाच अपघात, ब्रिटनमध्ये छोटे विमान कोसळले; एअरपोर्ट तात्पुरते बंद

 London Plane Crash

 London Plane Crash | अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानासारखीच आणखी एक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. ब्रिटनच्या लंडन साऊथेंड विमानतळावर (London Plane Crash) एक छोटे विमान कोसळून मोठा स्फोट झा्याची घटना समोर आली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातातील जीवितहानीबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिस आणि आपत्कालीन सेवांचा तपास सुरू आहे.

रिपोर्टनुसार, हे विमान शक्यतो ‘बीच बी200 सुपर किंग एअर’ प्रकारचे असावे. उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान कोसळले. हे लहान 12 मीटर लांबीचे विमान असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर व्हिडिओत आगीचा लोळ आणि धुराचा मोठा लोट दिसत आहे, पण अपघाताचे कारण अजून उलगडलेले नाही.

पोलिस आणि आपत्कालीन कारवाई

एसेक्स पोलिसांनी सांगितले की, ते घटनास्थळी आपत्कालीन सेवांसोबत काम करत आहेत. रॉचफोर्ड हंड्रेड गोल्फ क्लब आणि वेस्टक्लिफ रग्बी क्लब या परिसरातील ठिकाणे खबरदारी म्हणून रिकामी करण्यात आली. खासदार डेव्हिड बर्टन-सॅम्पसन यांनी नागरिकांना त्या भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

विमानतळ बंद

या घटनेनंतर विमानतळाने कामकाज तात्पुरते बंद केले असून, पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत. ईस्ट ऑफ इंग्लंड ॲम्ब्युलन्स सेवेने चार ॲम्ब्युलन्स, रॅपिड रिस्पॉन्स व्हेईकल आणि हॅझर्डस एरिया टीम पाठवली आहे. हा अपघात का झाला, याचा तपास सुरू आहे.