LPG Cylinder Price Hike | देशातील सामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचे चटके बसू लागले आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत 50 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. ही दरवाढ (LPG Cylinder Price Hike) केंद्र सरकारकडून अनुदानित आणि सामान्य अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी लागू करण्यात आली असून, नवीन दर 8 एप्रिलपासून लागू झाले आहेत.
ही घोषणा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी केली. विशेष म्हणजे, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्कात 2 रुपये प्रति लिटर वाढ जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच एलपीजी दरवाढीचीही बातमी आली.
एवढे असतील नव्या सिलिंडरचे दर
नवीन दरानुसार, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांसाठी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 500 रुपयांवरून 550 रुपये झाली आहे. तर इतर सामान्य ग्राहकांसाठी ही किंमत 803 रुपयांवरून वरून 853 रुपये झाली आहे. तुमच्या शहरातील किंमतीनुसार आता एलपीजी सिलेंडरसाठी 50 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana) ही ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन – विशेषतः एलपीजी – उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवली जाते. मात्र या दरवाढीने त्या महिलांवर आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक सिलिंडरचे दर मात्र घसरले
दुसरीकडे, 1 एप्रिल रोजी इंडियन ऑइलने (Indian Oil) व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 41 ते 45 रुपयांपर्यंत कपात जाहीर केली होती. परिणामी, दिल्लीत याच सिलिंडरचा दर 1803 रुपयांवरून 1762 रुपये झाला आहे. या कपातीतून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल-डिझेल शुल्क वाढ, पण ग्राहकांवर बोजा नाही?
सोमवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात रुपये 2 प्रति लिटर वाढ जाहीर केली. ही वाढ 8 एप्रिलपासून लागू झाली असून, वाढीनंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील 10 रुपये प्रति लिटर झाले आहे.
मात्र, हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले की, “या शुल्कवाढीचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार नाही. आम्ही प्रत्येक 2–3 आठवड्यांनी याचा आढावा घेत असतो. सध्यातरी कोणताही बोजा ग्राहकांवर टाकण्यात आलेला नाही.”