Home / देश-विदेश / Bhagavad Gita : ‘भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नाही, तर…’; मद्रास उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Bhagavad Gita : ‘भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नाही, तर…’; मद्रास उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Madras High Court on Bhagavad Gita : भगवद्गीता हा केवळ एका धर्माचा ग्रंथ नसून ते एक ‘नैतिक विज्ञान’ आहे, असे...

By: Team Navakal
Madras High Court on Bhagavad Gita :
Social + WhatsApp CTA

Madras High Court on Bhagavad Gita : भगवद्गीता हा केवळ एका धर्माचा ग्रंथ नसून ते एक ‘नैतिक विज्ञान’ आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कोईम्बतूर येथील एका ट्रस्टला विदेशी निधी मिळवण्यासाठी आवश्यक असलेले एफसीआरए (FCRA) नोंदणी प्रमाणपत्र नाकारल्याप्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती जी.आर. स्वामिनाथन यांनी हे विधान केले.

केंद्र सरकारने या ट्रस्टचे स्वरूप ‘धार्मिक’ असल्याचे सांगत त्यांचा अर्ज फेटाळला होता, ज्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

नेमके प्रकरण काय?

‘आर्ष विद्या परंपरा ट्रस्ट’ या संस्थेने केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने त्यांचा एफसीआरए अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. केंद्र सरकारने असा दावा केला होता की, हा ट्रस्ट भगवद्गीतेचे शिक्षण देतो, हठयोग आणि योग तत्त्वज्ञानाचे प्रशिक्षण देतो, त्यामुळे ही एक धार्मिक संस्था आहे. तसेच या संस्थेने नियमांचे उल्लंघन करून विदेशी निधी घेतल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता.

न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती स्वामिनाथन म्हणाले की, “भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर ते मानवी जीवनाचे नैतिक विज्ञान आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2007 मध्ये दिलेल्या निर्णयाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, गीता ही शाश्वत सत्यावर आधारित असून तिला ‘राष्ट्रीय धर्मशास्त्र’ म्हणून ओळखले जाऊ शकते. संविधानातील कलम 51-A नुसार देशाचा समृद्ध वारसा जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि भगवद्गीता हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, तिला कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत मर्यादित ठेवता येणार नाही.”

योगासने आणि वेदान्त हे धर्मनिरपेक्ष

न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की, वेदान्त आणि योगाचे शिक्षण देण्याकडे संकुचित धार्मिक दृष्टिकोनातून पाहू नये. योग हा शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी असलेला एक जागतिक आणि धर्मनिरपेक्ष अनुभव आहे. केंद्राने या ट्रस्टवर लावलेले आरोप अस्पष्ट असून नैसर्गिक न्यायतत्त्वांचे उल्लंघन झाल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

शेवटी, मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा जुना आदेश रद्द केला असून, या प्रकरणावर कायद्यानुसार नव्याने सुनावणी घेण्याचे आणि ट्रस्टला आपली बाजू मांडण्याची संधी देण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे आता भगवद्गीता आणि योगाचा प्रसार करणाऱ्या संस्थांच्या कायदेशीर व्याख्येकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन समोर आला आहे.

हे देखील वाचा – Sudhir Mungantiwar : ‘मंत्रिपद नाही म्हणून हरलो असं नसतं’; मुनगंटीवारांच्या घरच्या आहेरावर बावनकुळेंचे थेट उत्तर

Web Title:
संबंधित बातम्या