Dubai Skyscraper Fire: दुबईत 67 मजली इमारतीला भीषण आग! 3,800 रहिवाशांना सुरक्षित काढले बाहेर, जीवितहानी टळली

Dubai Skyscraper Fire

Dubai Skyscraper Fire | दुबई मरिनामधील (Dubai Marina) 67 मजली गगनचुंबी इमारतीला (Residential Skyscraper) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.. ‘मरिना पिनॅकल’ किंवा ‘टायगर टॉवर’ (Tiger Tower) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इमारतीत लागलेली आग पाहून संपूर्ण परिसर भीती पसरली होती.

दुबई नागरी संरक्षण दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे 3,800 हून अधिक रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आग कशी लागली?

रिपोर्टनुसार , दुबई नागरी संरक्षण दलाने सहा तास अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. विशेष अग्निशमन आणि बचाव पथकांनी764 अपार्टमेंटमधील 3,820 रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं.

दुबई मीडिया ऑफिसने सांगितलं की, स्थलांतरण कोणत्याही गोंधळाशिवाय पूर्ण झालं. “आग पूर्णपणे आटोक्यात आहे, आणि कूलिंग ऑपरेशन्समुळे धूर दिसत आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. विस्थापित रहिवाशांसाठी तात्पुरत्या निवासाचीव्यवस्था करण्यासाठी प्रशासन इमारतीच्या बिल्डरशी समन्वय साधत आहे.

काही रहिवाशांनी सांगितलं की, सुरुवातीला आगीची माहिती मिळण्यात उशीर झाला. काहींना शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावल्यानंतर किंवा बाहेर अग्निशमन गाड्या दिसल्यानंतरच आगीची जाणीव झाली. एका रहिवाशाने सांगितलं, “फायर अलार्म वाजलाच नाही, किंवा आम्हाला ऐकू आला नाही.”

यापूर्वीही आग

‘मरिना पिनॅकल’ला आग लागण्याची ही पहिली वेळ नाही. 2015 मध्ये 47व्या मजल्यावर स्वयंपाकघरात लागलेली आग 48व्या मजल्यापर्यंत पसरली होती. जवळच असलेल्या ‘द टॉर्च’ इमारतीलाही 2015 आणि 2017 मध्ये आग लागली होती. या घटनांमुळे गगनचुंबी इमारतींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.