इस्लामाबाद– तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील (Pakistan)आपले २५ वर्षांचे कामकाज थांबवण्याचा (shut down)निर्णय घेतला आहे. २,००० साली पाकिस्तानात कार्यालय सुरू करणाऱ्या मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आता देशातील अस्थिर व्यावसायिक वातावरण आणि अनिश्चिततेमुळे आपले कॉर्पोरेट ऑपरेशन पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानमधील उच्च शिक्षण आयोग, पंजाब ग्रुप ऑफ कॉलेजेस यांच्यासह मायक्रोसॉफ्टने विविध भागीदारीतून डिजिटल स्कील्स, ट्रेनिंग, रिमोट लर्निंग आणि टेक सोल्यूशन्स उपलब्ध करून दिले होते. मात्र सध्याच्या आर्थिक आणि धोरणात्मक अस्थिरतेमुळे कंपनीने पाकिस्तानमधून माघार घेण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या निर्णयाची माहिती मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानचे सहसंस्थापक जव्वाद रहमान (Jawwad Rehman)यांनी लिंक्डइनवरील पोस्टद्वारे दिली. ते म्हणाले की, एका युगाचा अंत झाला आहे. बरोबर २५ वर्षांपूर्वी (25-year presence) जून महिन्यात मला पाकिस्तानात मायक्रोसॉफ्ट सुरू करण्याची जबाबदारी मिळाली होती. आज कंपनीच्या उरलेल्या काही कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले आहे की मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानमधून बाहेर पडत आहे. सध्या कंपनीच्या पाकिस्तानातील केवळ एका कार्यालयात पाच कर्मचारी उरले आहेत. हा निर्णय आपल्या देशाच्याच सद्य परिस्थितीचा निदर्शक आहे. हे असे वातावरण आहे जिथे मायक्रोसॉफ्टसारख्या बलाढ्य कंपनीलाही अस्थिरता जाणवत आहे.