Microsoft Layoffs | मायक्रोसॉफ्टमधील (Microsoft Layoffs) नोकरकपात पुन्हा चर्चेत आली आहे. कंपनीने आपल्या 3% कर्मचाऱ्यांना, म्हणजेच 6,000 हून अधिक लोकांना कामावरून कमी केल्याची माहिती दिली आहे.
ही कपात तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार हे पाऊल “संघटनात्मक बदल आणि गतिशील बाजारात स्वतःला अधिक सशक्त करण्याच्या उद्देशाने” उचलण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, कंपनी सध्या AI (Artificial Intelligence) आणि क्लाउड सेवा (Cloud services) यामध्ये प्रचंड गुंतवणूक करत असून, त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी कार्यबलात कपात आवश्यक आहे.
एआय विस्तार चालू, पण खर्च वाढल्यामुळे कपात
मायक्रोसॉफ्ट सध्या AI tools आणि सेवांसाठी डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. यंदाच्या वर्षात कंपनीचा भांडवली खर्च $80 अब्जपर्यंत जाऊ शकतो, असं अंदाज वर्तवला जात आहे. गूगल (Google), ॲमेझॉन (Amazon), मेटा (Meta) यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा टिकवण्यासाठी ही गुंतवणूक अपरिहार्य आहे. मात्र, त्यामुळे ऑपरेटिंग खर्च वाढला आहे आणि नफा घटत आहेत.
व्यवस्थापन स्तरात बदल, ‘फ्लॅटर स्ट्रक्चर’चा प्रयत्न
मायक्रोसॉफ्टच्या मुख्य वित्तीय अधिकारी एमी हूड (Amy Hood) यांनी व्यवस्थापनाचे थर कमी करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे कंपनीमध्ये जलद निर्णय प्रक्रिया शक्य होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. लिंक्डइन व आंतरराष्ट्रीय कार्यालयांतील अनेक विभागांवर या टाळेबंदीचा परिणाम झाला असल्याची माहिती आहे.
केवळ परफॉर्मन्स नव्हे, व्यापक पुनर्रचना
कंपनीने याआधी यंदाच्या सुरुवातीला परफॉर्मन्सच्या आधारे नोकरकपात केली होती. मात्र, आता मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे व ती केवळ कामगिरीवर आधारित नाही. कंपनी आपल्या मुख्य उद्दिष्टांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी हे बदल करत असल्याचे सांगते.
‘सॉफ्टवेअर कंपनी’ ते ‘AI-Cloud पॉवरहाऊस’
मायक्रोसॉफ्ट आज केवळ विंडोज (Windows Operating System) सॉफ्टवेअरपुरती मर्यादित नाही. तिचा ‘Azure’ हा क्लाउड व्यवसाय वेगाने वाढतो आहे, पण तिथेही नफा कमी होताना दिसतो आहे. गेल्या आर्थिक तिमाहीत मायक्रोसॉफ्ट क्लाउडचा वाटा 72% वरून 69% वर घसरले. त्यामुळे, वाढत्या खर्चाची भरपाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून केली जात असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, सिलिकॉन व्हॅलीत (Silicon Valley) AI आणि डेटा सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे, पण त्याच वेळी गुगल, मेटा, ॲमेझॉनसारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. हीच प्रक्रिया आता मायक्रोसॉफ्टनेही स्वीकारल्याचे स्पष्ट होत आहे.