Pahalgam Terror Attack | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सध्याचा संघर्ष धर्म आणि अधर्म यांच्यातील आहे, तो केवळ कोणत्याही संप्रदाय किंवा धर्माच्या नावावर नाही. जे लोक धर्म विचारून लोकांची हत्या करतात ते कट्टरपंथी आहेत आणि असे कृत्य राक्षसी वृत्ती दर्शवते, असेही ते म्हणाले.
आपल्याकडे शक्ती असेल तर ती दाखवावी लागेल, असेही दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यावर जोर देताना आरएसएस प्रमुख म्हणाले. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या 83व्या स्मृतिदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आरएसएस प्रमुख म्हणाले, “हे युद्ध संप्रदाय किंवा धर्मांमध्ये नाही. याचा आधार नक्कीच धर्म आणि संप्रदाय आहे, पण हे खऱ्या अर्थाने धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे.” ते पुढे म्हणाले, “भारतीय सैनिक किंवा नागरिकांनी कधीही कोणाची धर्म विचारून हत्या केली नाही. हिंदू कधीही धर्म विचारून हत्या करत नाहीत. जे लोक धर्म विचारून लोकांची हत्या करतात, ते कट्टरपंथी आहेत आणि असे कृत्य राक्षसी वृत्ती दर्शवते.”
त्यांनी तीव्र भावना व्यक्त करताना म्हटले, “आपल्या मनात दुःख आहे. आपण रागात आहोत, पण वाईटाला नष्ट करण्यासाठी शक्ती दाखवावी लागेल. रावणाने आपला इरादा बदलला नाही, तेव्हा दुसरा कोणताही पर्याय नव्हता. रामाने त्याला सुधारण्याची संधी दिली आणि त्यानंतर त्याला मारले.”
दुसरीकडे आज काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यांनी श्रीनगरमधील एका रुग्णालयात हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचीही भेट घेतली. या हल्ल्याद्वारे दहशतवादी समाजाला विभागू इच्छितात, असे ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, “ही एक भयानक शोकांतिका आहे. काय घडत आहे हे समजून घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी मी येथे आलो आहे. जम्मू-काश्मीरच्या संपूर्ण जनतेने या भयानक कृत्याचा निषेध केला आहे आणि या वेळी देशाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. जखमी झालेल्यांपैकी मी एका व्यक्तीला भेटलो. ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले, अशा सर्वांसाठी माझे प्रेम आणि आपुलकी आहे. संपूर्ण देश एकजूट आहे. काल आमची सरकारसोबत बैठक झाली होती.” संयुक्त विरोधी पक्षाने या हल्ल्याचा निषेध केला आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दहशतवाद्यांना उद्देशून पंतप्रधान मोदींनी देखील बिहारमध्ये बोलताना ठाम शब्दांत इशारा दिला की, “हा हल्ला करणाऱ्यांना आणि त्यामागे असणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडची शिक्षा मिळेलच. आता उरलेल्या दहशतवाद्यांची मातीत मिसळण्याची वेळ आली आहे.”, असे ते म्हणाले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधातपावले उचलली आहेत. भारताने सर्वप्रथम सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार भारत आणि पाकिस्तानमधील तीन युद्धांच्या काळातही टिकून होता, आणि दरवर्षी सुमारे 39 अब्ज घनमीटर पाणी भारतातून पाकिस्तानमध्ये जात होते.
याशिवाय, अटारी-वाघा सीमेवरील (Attari Wagah Border) एकात्मिक तपास चौकी (Integrated Check Post) देखील त्वरित बंद करण्यात आली आहे. ही चौकी दोन्ही देशांतील व्यापार आणि लोक-ते-लोक संबंधांसाठी महत्त्वाची मानली जात होती. भारतात आलेल्या नागरिकांना 1 मे 2025 पूर्वी पाकिस्तानात परतण्यास सांगण्यात आले आहे.
सरकारने सार्क व्हिसा माफी योजनेअंतर्गत (SAARC Visa Exemption Scheme) पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश नाकारला आहे. आधीच भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.