Parliament Monsoon Session: आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू, ‘ऑपरेशन सिंदूर’सह ‘हे’ मुद्दे गाजणार

Parliament Monsoon Session

Parliament Monsoon Session: आजपासून (21 जुलै) संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) सुरू होत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरचे (Operation Sindoor) हे पहिलेच अधिवेसन असल्याने संसदेत विरोधी पक्ष व सरकारमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळू शकते. अधिवेशनच्याआधी सरकार ‘ऑपरेशन सिंदूर’ यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी पूर्णपणे तयार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी दिली आहे.

सरकार कोणत्याही विषयावरून माघार घेणार नाही, असं स्पष्ट करत त्यांनी सभागृहात कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.

सर्वपक्षीय बैठकीनंतर चर्चेचे संकेत

रविवारी (20 जुलै) पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर, रिजिजू म्हणाले, “सरकार संसदेतील प्रत्येक विषयावर चर्चेला तयार आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी समन्वय साधून सभागृह चालवणं आवश्यक आहे.” ऑपरेशन सिंदूर, तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेत असलेल्या अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या सीजफायर दाव्यांवर विरोधक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलं आहे.

रिजिजू म्हणाले, “सर्व प्रश्नांची उत्तरं संसदेत दिली जातील. कोणताही विषय संसदेबाहेर नेला जाणार नाही.” पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उपस्थित राहून चर्चांना महत्त्व देतात, याची आठवणही त्यांनी करून दिली.

17 विधेयकं चर्चेसाठी सज्ज; महाभियोग प्रस्तावावर हालचाल

या अधिवेशनात 17 नवे विधेयकं मांडली जाणार आहेत. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात 100 हून अधिक खासदारांनी महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या असून, तो प्रस्ताव याच अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे. मात्र, अचूक तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

या अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोग हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.

सर्वपक्षीय बैठकीत 51 पक्षांच्या 54 प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या वेळी, छोट्या पक्षांना संसदेत बोलण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीमध्ये वेळवाटपाबाबत फेरआढावा घेण्याची गरज असल्याचे रिजिजू यांनी मान्य केले. हा मुद्दा लोकसभा अध्यक्ष व राज्यसभा अध्यक्षांकडे मांडला जाणार आहे.

32 दिवसांचं अधिवेशन, 21 बैठकांचा कार्यक्रम

संसदेचे हे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून 21 ऑगस्ट 2025 पर्यंत, म्हणजेच 32 दिवस चालणार आहे.या दरम्यान 21 बैठकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. 13 व 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे कामकाज होणार नाही.

हे देखील वाचा –

Pravin Darekar: क्षमतेपेक्षा जास्त लोकं आत घुसले, प्रवीण दरेकरांसह 17 जण 20 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले

सभागृहात जंगली रमीचा डावमंत्री कोकाटेंवर विरोधकांची टीका

Tax Free Countries: पूर्ण पगार तुमचाच! जगातील ‘हे’ आहेत असे देश जिथे भरावा लागत नाही कर