ब्रसेल्स- रशियाशी (Russia) चालू असलेला व्यापार थांबवा, अन्यथा १०० टक्के कर (Tariff) आणि निर्बंधांना तयार राहा, असा थेट इशारा नाटोचे महासचिव मार्क रूट (NATO Secretary General Mark Root) यांनी भारत (India), चीन (China) आणि ब्राझील (Brazil) यांना दिला आहे. अमेरिकेच्या कॅपिटोल हिल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रूट म्हणाले, जर भारताचे पंतप्रधान, चीनचे राष्ट्राध्यक्ष किंवा ब्राझीलचे अध्यक्ष अजूनही रशियाकडून तेल व वायू खरेदी करत असाल आणि रशियाने युद्धबंदी आणि शांतता चर्चांना गांभीर्याने घेतले नाही, तर आम्ही तुमच्यावर १०० टक्के दुय्यम (Secondary) निर्बंध लावू.
मार्क रूट यांनी भारत, चीन आणि ब्राझीलच्या नेत्यांना थेट पुतिनला फोन करून युद्धबंदीवर दबाव टाकण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, पुतिनला फोन करा आणि सांगा की युक्रेनसोबत शांतता चर्चा सुरू करणे आवश्यक आहे, अन्यथा हा निर्णय भारत, ब्राझील आणि चीनसाठी अत्यंत महाग पडेल.
मार्क रूट यांच्या या वक्तव्यानंतर लगेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला नवे संरक्षण सहाय्य जाहीर केले आणि रशिया व त्याचे व्यापार भागीदार देशांवर कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला. यामध्ये पॅट्रिओट मिसाईल सिस्टीमसारखी आधुनिक हत्यारे युक्रेनला देण्याचाही निर्णय घेतल्याचे व्हाईट हाऊसने सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, ५० दिवसांत युक्रेन-रशिया युद्धबंदी करार झाला नाही, तर रशियाच्या निर्यातीवर आणि त्याच्या व्यापार भागीदारांवर १०० टक्के कर आणि दुय्यमनिर्बंध लावले जातील.
इतकेच नाही तर, अमेरिकन संसदेमध्ये १०० पैकी ८५ सिनेटरांनी ट्रम्प यांना रशियाला मदत करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा अधिकार देणाऱ्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.