राष्ट्रीय सुरक्षेचे धडे शाळेत! NCERT विद्यार्थ्यांसाठी आणणार ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित अभ्यासक्रम

NCERT Operation Sindoor Module

NCERT Operation Sindoor Module: ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादविरोधातील कारवाईशी संबंधित अभ्यासक्रम (Operation Sindoor Module) लवकरच विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदने (NCERT) वरिष्ठ विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आणि सध्याच्या घडामोडींशी थेट संबंधित अभ्यासक्रम तयार केला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमात भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईचे अभ्यासपूर्ण विश्लेषण सादर होणार आहे. सध्या या अभ्यासक्रमाचे अंतिम टप्प्यात काम सुरू असून तो लवकरच प्रसिद्ध होणार आहे. याबाबत इंडिया टूडेने वृत्त दिले आहे.

पहलगामवरील हल्ल्यानंतरचा भारतीय प्रतिसाद अभ्यासक्रमात

एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकमध्ये घुसून दहशतवादी तळांवर अचूक हवाई कारवाई केली होती. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीला आदरांजली वाहतानाच, भारताच्या धोरणात्मक निर्णय क्षमतेवर प्रकाश टाकणारा हा अभ्यासक्रम देशाच्या सामरिक शौर्याचा दस्तऐवज ठरणार आहे.

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रक्रियेचे समज

हा अभ्यासक्रम स्वतंत्र प्रकरण स्वरूपात तयार करण्यात येत असून, विद्यार्थ्यांना दहशतवादी हल्ल्यांना देश कसा प्रतिसाद देतो, निर्णय प्रक्रियेत लष्करी आणि मुत्सद्देगिरीचा कसा समन्वय होतो, हे समजून घेण्यास मदत होईल. सुरुवातीला हा अभ्यासक्रम फक्त उच्च माध्यमिक वर्गांसाठी असला तरी भविष्यात माध्यमिक विद्यार्थ्यांसाठीही अनुकूल केला जाऊ शकतो.

या प्रकरणात फक्त लष्करी कारवाईचा तपशीलच नव्हे, तर त्यामागील मुत्सद्देगिरी, सुरक्षा धोरणे, आणि प्रादेशिक स्थैर्यावर झालेले परिणाम यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास असेल. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि लष्करी नेतृत्वाने घेतलेल्या त्वरित निर्णयांची प्रशंसा आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली होती.

नवीन अभ्यासक्रम धोरणाचा भाग

हा उपक्रम राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत सुरू करण्यात आला आहे. NCERT ने याआधी इयत्ता 6वी आणि 8वीसाठी इंग्रजी, समाजशास्त्र, संस्कृतसारख्या विषयांची नवी पाठ्यपुस्तके प्रकाशित केली आहेत. तसेच ‘कौशल बोध’ नावाचा व्यावसायिक अभ्यासक्रमही आणण्यात आला आहे.