इतके पैसे कुठून आणता? खा.दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादी जाहीर

Nishikant Dubey Where do you get so much money from? Dubey targets Thackeray brothers

नवी दिल्ली- झारखंडमधील गोड्डाचे भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी पुन्हा उबाठा(UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरेंवर (Raj Thackeray)निशाणा साधला आहे. त्यांनी एक्स पोस्ट करत उबाठाच्या एका नेत्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि राज ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तांची यादी जाहीर करत, त्यांच्याकडे इतके पैसे कुठून येतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे . त्याचबरोबर २००७ च्या विकिलिक्सच्या अहवालाचा हवाला देत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दुबेंनी उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या भ्रष्टाचाराची कहाणी असे म्हणत एक्स (X) पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी एका उबाठा नेत्याचे मुंबईतील विविध ठिकाणचे फ्लॅट आणि कोकणातील मालमत्तांची यादी जाहीर केली आहे. ते म्हणाले की, न्यू मोर सांताक्रुझमध्ये ३ बीएचके फ्लॅट, बांद्रामध्ये ४ बीएचके फ्लॅट, नालासोपारातील रचना रामेश्वर, समृध्दी मातृभक्तीमध्ये फ्लॅट, विरारमधील एअर इंडियाच्या कॉलनीत (Air India colony) त्यांचा फ्लॅट आहे. एवढेच नाही तर बोरिवलीमध्ये दुकान, नालासोपारा येथे रेस्टॉरंट (Restaurant), कोकणात केळवे येथे निवासी मालमत्ता या नेत्याकडे आहे. हे एवढा पैसा कुठून आणतात? दुबेंनी आपल्या पोस्टमध्ये संबंधित नेत्याचे नाव मात्र लिहिलेले नाही. त्यामुळे एवढी मालमत्ता ठाकरेंच्या कोणत्या नेत्याकडे आहे, याबाबत आता चर्चेला उधाण आले आहे.

दुबेंनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये २००७ च्या विकिलिक्सच्या (WikiLeaks) अहवालाचा हवाला देत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, राज ठाकरेंना जनतेचे समर्थन मिळत नाही तेव्हा गुंडांना पुढे करतात. याचा अर्थ गुंडगिरी करणे हा त्यांचा खरा हेतू आहे. माझा विरोध ठाकरेंच्या गुंडगिरीला आहे. सहनशीलता संपली आहे. मराठा समाज नेहमीच आदरणीय आहे. देश आपल्या सर्वांचा आहे. मी जिथे खासदार आहे तिथून मराठा मधु लिमये जी सलग तीन वेळा खासदार होते. इंदिरा गांधीजींच्या विरोधात आम्ही एका मराठ्याला लोकसभा जिंकून दिली. ठाकरे, भानावर या, तुमचा लढा मराठा बनवू नका, आम्ही मुंबईच्या विकासातही योगदान दिले आहे आणि देत राहू.