नवी दिल्ली – देशातील शेतकरी, मच्छिमार आणि पशुपालकांच्या हिताशी भारत कदापि तडजोड करणार नाही. त्यासाठी कितीही किंमत चुकती करावी लागली तरी आम्ही डगमगणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (. Prime Minister Narendra Modi)यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (U.S. President Donald Trump.) यांनी नुकत्याच भारतावर लादलेल्या आयातशुल्कावर (tariffs)आपली ठाम भूमिका मांडली.
राजधानी दिल्लीत डॉ. एम एस स्वामीनाथन (Dr. M. S. Swaminathan.)यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कृषी संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
मी माझ्या देशातील शेतकऱ्यांच्या (farmers), मच्छिमारांच्या (fishermen) आणि पशुपालकांच्या हिताशी कदापि तडजोड करणार नाही. त्यासाठी मोठी वैयक्तिक किंमत चुकती करावी लागेल याची मला जाणीव आहे. परंतु मी आणि माझा देश ती किंमत चुकती करायला तयार आहे. देशाची अन्न सुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या हिताला मी सर्वोच्च प्राधान्य देतो, असे मोदी म्हणाले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील सर्व देशांवर आयातशुल्कवाढीचे अस्त्र उगारले आहे. अमेरिकेला भारताशी व्यापारी करार करायचा आहे. या कराराच्या माध्यमातून अमेरिकन कंपन्यांना(American companies)भारताच्या कृषी क्षेत्रात मुक्त वाव मिळावा असा ट्रम्प यांचा आग्रह आहे. त्यासाठी ट्रम्प यांनी करार अंतिम करण्यासाठीची ३१ जुलैपर्यंतची मुदत संपण्याच्या एक दिवस आधीच भारतावर २५ टक्के (25% import)आयातशुल्क लागू केले होते. त्यानंतरही भारताने रशियाकडून (Russia)कच्चे तेल खरेदी न थांबवल्याने त्याची शिक्षा म्हणून बुधवारी आणखी २५ टक्के असे मिळून एकूण ५० टक्के आयातशुल्क लावले आहे. मात्र भारताने ट्रम्प यांच्या दबावासमोर न झुकण्याची कणखर भूमिका घेतली आहे.