माणुसकीला काळिमा! ओडिशात मित्राचे हातपाय बांधून तरुणीवर सामूहिक अत्याचार, 10 जणांना अटक

Odisha Gang Rape Case

Odisha Gang Rape Case | ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील गोपालपूर समुद्रकिनाऱ्यावर (Gopalpur Beach) 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्या मित्रासमोर सामूहिक बलात्कार (Gangrape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेत पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. यापैकी काहीजण अल्पवयीन आहेत.

पीडिता आणि तिचा मित्र राजा सण साजरा करण्यासाठी गोपालपूर बीचवर गेले असताना ही भयानक घटना घडली होती.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आणि तिचा वर्गमित्र संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावरील एका निर्जन ठिकाणी बसले होते. त्याचवेळी, 3 मोटरसायकलींवरून आलेल्या 10 तरुणांनी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली आणि ते ऑनलाइन टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी मित्रावर हल्ला करून त्याचे हात बांधले आणि पीडितेला जवळच्या एका निर्जन घरात ओढत नेले. तिथे 3 जणांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला, तर इतरांनी तिच्या मित्रावर पाळत ठेवली.

या घटनेनंतर पीडिता आणि तिचा मित्र गोपालपूर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तक्रार दाखल केली. ब्रह्मपूरचे (Brahmapur) पोलीस अधीक्षक श्रावणा विवेक एम यांनी सांगितलं, की पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून सर्व 10 आरोपींना अटक केली आहे. यात 6 प्रौढ आणि 4 अल्पवयीनांचा समावेश आहे. 17 वर्षांचे असलेले अल्पवयीन आरोपी ज्युवेनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर केले जातील. प्रौढ म्हणून खटला चालवण्यासाठी पोलिसांनी बोर्डाकडे अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितेची आणि आरोपींची वैद्यकीय तपासणी सुरू असून, पीडितेची प्रकृती स्थिर आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या घृणास्पद घटनेचा तीव्र निषेध करून आरोपींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. “हा माणुसकीविरुद्धचा गुन्हा आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही,” असं त्यांच्या कार्यालयाने निवेदनात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री प्रभाती परिडा यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आणि अशा घटना टाळण्यासाठी पावलं उचलली जातील, असं सांगितलं. पोलिसांनी इतर संभाव्य सहभागींचा तपास सुरू ठेवला आहे. महिला आयोगाने देखील या प्रकरणाची दखल घेतली असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.