Mock Drill | सीमावर्ती राज्यांमध्ये होणारे मॉक ड्रिल तूर्तास स्थगित, ‘हे’ आहे कारण

Mock Drill Postponed

Mock Drill Postponed | पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात, राजस्थान, हरियाणा, चंदीगड आणि जम्मू या राज्यांमध्ये आज (29 मे) नियोजित असलेला नागरी संरक्षण सराव ‘ऑपरेशन शील्ड’ (Operation Shield) प्रशासकीय कारणांमुळे (administrative reasons) स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं आहे की, या सीमावर्ती राज्यांमध्ये मॉक ड्रिल्स (mock drills) रद्द करण्यामागे “प्रशासकीय कारणे” असून मॉक ड्रिलची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

हरियाणा सरकारमधील अधिकृत सूत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, “हरियाणात 29 मे रोजी नियोजित असलेला ‘ऑपरेशन शील्ड’ सराव आता स्थगित करण्यात आला आहे.”

काय आहे ‘ऑपरेशन शील्ड’ ?

केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरपासून गुजरातपर्यंतच्या पश्चिम सीमावर्ती भागांतील जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ले, ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा सामना करण्यासाठी नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. अग्निशमन सेवा आणि होमगार्ड महासंचालनालयाने दिलेल्या पत्रात ‘ऑपरेशन शील्ड’ या सरावाचे आयोजन जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि चंदीगड या राज्यांमध्ये होणार असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

सरावाअंतर्गत, नागरी संरक्षण प्राधिकरणांनी स्थानिक प्रशासन व सर्व संबंधितांना सहभागी करून 29 मे रोजी सायंकाळी 5 वाजता एकत्रित सराव आयोजित करण्याचं निर्देश देण्यात आले होते. एनसीसी, एनएसएस, एनवायकेएस व भारत स्काउट्स अँड गाइड्स यांसारख्या युवा स्वयंसेवक संस्थांनीही स्थानिक प्रशासनाला नागरी संरक्षण उपाययोजनांमध्ये सहकार्य करावे, असे पत्रात म्हटले होते. मात्र, आता तुर्तास हे मॉक ड्रिल स्थगित करण्यात आले आहे.

याआधी, 7 मे 2025 रोजी देशभरात मॉक ड्रिल घेण्यात आले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू होण्याच्या काही तास आधी हे मॉक ड्रिल पार पडले होते. गृह मंत्रालयाच्या संचालनालयानुसार, या मॉक ड्रिलदरम्यान देशभरातील असुरक्षित भागांमध्ये गंभीर त्रुटी समोर आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर, तातडीने आपत्कालीन अधिकार लागू करण्यात आले आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत निधीची व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील ‘ऑपरेशन शील्ड’ मध्ये, नागरी संरक्षण वॉर्डन आणि स्वयंसेवकांना शांततामय पद्धतीने परत बोलावणे अशा संभाव्य संकटस्थितीचा सराव करणे अपेक्षित होते.