‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे बुद्धिबळाचा खेळ; लष्करप्रमुख द्विवेदी म्हणाले, ‘भारताने पाकिस्तानला…’

General Upendra Dwivedi on Operation Sindoor

General Upendra Dwivedi on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरदरम्यान (Operation Sindoor) पाकिस्तानची 6 विमाने पाडली होती, अशी माहिती नुकतीच भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी दिली होती. आता भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे बुद्धिबळाचा खेळ होता, असे म्हटले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ हे कोणत्याही पारंपरिक लष्करी मोहिमेसारखे नव्हते. यात शत्रूची पुढची चाल काय असेल हे निश्चित नव्हते. त्यामुळे ही मोहिम म्हणजे बुद्धिबळाच्या खेळासारखी होती. पण या खेळात भारताने पाकिस्तानला निर्णायक ‘चेकमेट’ दिला आणि विजय मिळवला, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले आहे.

आयआयटी मद्रासमध्ये एका कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुख म्हणाले, “‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आम्ही बुद्धिबळ खेळलो. शत्रूची पुढची चाल काय असेल आणि आम्हाला काय करायचे आहे, हे आम्हाला माहीत नव्हते. यालाच ‘ग्रेझोन’ (Greyzone) म्हणतात.

‘ग्रेझोन’ म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने युद्ध करत नाही. आपण पारंपरिक कारवाईच्या थोड्याच कमी स्तरावर काम करतो. आम्ही बुद्धिबळाच्या चाली करत होतो आणि शत्रूही चाली करत होता. कुठे आम्ही त्यांना चेकमेट देत होतो, तर कुठे स्वतःच्या नुकसानीचा धोका पत्करून निर्णायक हल्ला करत होतो, कारण आयुष्य याचबद्दल आहे.”, असे ते म्हणाले.

‘विजयाची भावना मनात असते’

पाकिस्तानने लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फाइव्ह स्टार जनरल आणि फील्ड मार्शल (Field marshal) पद देऊन स्वतःला विजयी ठरवण्याचा प्रयत्न केला, यावरही जनरल द्विवेदी यांनी टीका केली. ते म्हणाले, “विजयाची भावना नेहमीच मनात असते. तुम्ही एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला विचारले की तुम्ही हरलात की जिंकलात, तर तो म्हणेल, ‘आमचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल झाले आहेत, म्हणजे आम्ही जिंकलोच असणार’.”

जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, 7 मे रोजी सुरू झालेली ही दहशतवादविरोधी मोहिम जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam terrorist attack) उत्तर म्हणून सुरू करण्यात आली होती. या हल्ल्यात पाकिस्तान-स्थित दहशतवाद्यांनी 26 नागरिकांची हत्या केली होती. या मोहिमेला राजकीय इच्छाशक्ती (Political will) आणि सरकारच्या स्तरावर धोरणात्मक स्पष्टतेमुळे यश मिळाले.

‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का?

‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाबद्दल बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले, “या छोट्याशा नावाने संपूर्ण देशाला एकत्र आणले. या नावाने देशाला प्रेरित केले.” या मोहिमेत भारताने पाकिस्तानमधील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ आणि पायाभूत सुविधांवर अचूक हल्ले केले. या हल्ल्यांसाठी हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा वापर करण्यात आला. या मोहिमेत नऊ विशिष्ट लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले.