Operation Sindoor | पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवत पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला.
पाकिस्तान केवळ खोट्या दाव्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत नाही, तर भारताच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दलही (Surgical Strike) खोटे आरोप करत आहे, असे मिस्री यांनी स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, “खोटं बोलणं हे पाकिस्तानच्या रक्तातच आहे. 1947 मध्ये जेव्हा जम्मू-काश्मीरवर (Jammu-Kashmir) हल्ला झाला, तेव्हाही पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात खोटं बोललं होतं की, त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. खोटं बोलण्याचा हा प्रवास तिथूनच सुरू झाला आणि आजही सुरू आहे.”
पाकिस्तान जन्मजात खोटारडा
1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांतच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरवर कब्जा करण्याचा कट रचला होता. त्यांनी थेट युद्ध करण्याऐवजी घुसखोरांची मदत घेतली. पाकिस्तानच्या सैन्याने उत्तर-पश्चिम सीमा प्रांतातील (आता खैबर पख्तूनख्वा) हजारो लढाऊंना शस्त्रे देऊन जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले. या लढाऊंना केवळ पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षण आणि संघटनच दिले नव्हते, तर हल्ल्यादरम्यान त्यांना रसद आणि रणनीतिक मदतही पुरवली होती. या लढाऊंनी बारामुल्लासारख्या भागात मोठ्या प्रमाणात लूटमार, हिंसा आणि सामान्य नागरिकांची हत्या केली, ज्यामुळे खोऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात फसवणूक केली
भारताने या हल्ल्याला लष्करी कारवाईने उत्तर देण्यास सुरुवात केली आणि महाराजा हरिसिंह यांनी भारतासोबतच्या विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली, तेव्हा पाकिस्तान घाबरला. आंतरराष्ट्रीय दबावापासून वाचण्यासाठी संयुक्त राष्ट्रात खोटं बोललं की, त्यांचा या हल्ल्याशी काही संबंध नाही आणि हे सर्व स्थानिक बंड आहे. मात्र, भारताने पुराव्यांसह संयुक्त राष्ट्रात स्पष्ट केले की, हा हल्ला पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या सैन्याच्या संगनमताने झाला होता.
विक्रम मिस्री ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत मिस्री यांनी स्पष्ट केले की, भारताची कारवाई केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करणारी होती आणि त्यात एकाही सामान्य नागरिकाला इजा झाली नाही. मिस्री यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “पाकिस्तान नागरिकांबाबत आक्रोश करत आहे, ते त्यांच्या दहशतवादी नेटवर्कला वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे.” पाकिस्तानच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी नीलम-झेलम प्रकल्पावरील हल्ल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळला “जर पाकिस्तानने आमच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचा कट रचला, तर त्याला उत्तराला सामोरे जावे लागेल.”, असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी दिला.