‘दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा पुरावा काय? स्थानिक असू शकतात’, पहलगाम हल्ल्याबाबत पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने मोठा वाद

P Chidambaram Statement on Pahalgam Terror Attack

P Chidambaram Statement on Pahalgam Terror Attack: आजपासून संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) व ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) वर चर्चा सुरू होणार आहे. मात्र, या चर्चेपूर्वीट एक मोठा राजकीय वाद पेटला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ‘स्थानिक दहशतवादी’ (homegrown terrorists) सामील असू शकतात, असे चिदंबरम म्हणाले आहेत. तसेच, हल्लेखोर पाकिस्तानमधून आले होते हे सिद्ध करणारे काय पुरावे आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. (P Chidambaram Statement on Pahalgam Terror Attack)

‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत माजी गृहमंत्री चिदंबरम म्हणाले की, “हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने कोणती कारवाई केली, हे सरकारने उघड करायला हवे. हल्लेखोर कोण होते? ते कुठून आले? मला वाटते, ते स्थानिक दहशतवादी असू शकतात. ते पाकिस्तानातून आले होते असे का गृहीत धरले जाते? याचा कोणताही ठोस पुरावा नाही.” त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान झालेल्या नुकसानीबाबत माहिती लपवण्यात आल्याचाही आरोप केला.

त्यांनी पुढे म्हटले, “ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल दुसऱ्या महायुद्धादरम्यान दररोज निवेदन देत असत. ब्रिटनला झालेलं नुकसानही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आपण का लपवतो?” असा सवाल विचारत सरकारवर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.

भाजपकडून काँग्रेसवर जोरदार पलटवार

चिदंबरम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे अमित मालवीय यांनी काँग्रेसवर निशाणा साधा आहे , “युपीए सरकारच्या काळात गृहमंत्री असलेले आणि ‘भगवा दहशतवाद’ संकल्पनेचे मूळ प्रवर्तक चिदंबरम पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने बोलताना दिसत आहेत. काँग्रेसने पुन्हा एकदा पाकिस्तानला क्लीन चिट दिली आहे.”

त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “दहशतवाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या आपल्या सैन्याच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी काँग्रेसचे नेते इस्लामाबादच्या वकिलासारखे का बोलतात? राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही संदिग्धता नको, पण काँग्रेस नेहमी शत्रूच्या बाजूने वाकते,” असेही मालवीय यांनी म्हटले. या वादानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.