Asim Munir : पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या ‘त्या’ भाषणामुळे पहलगाम हल्ला झाला? कोण आहे असीम मुनीर? जाणून घ्या

Asim Munir

who is Pakistani General Asim Munir | पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (Asim Munir) यांनी 17 एप्रिल रोजी दिलेल्या भडकाऊ भाषणानंतर केवळ 5 दिवसांत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता या हल्ल्याला मुनीर यांच्या वक्तव्यांनी चिथावणी मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आदिल रझा (Adil Raja) यांनी दावा केला आहे की, हल्ल्याचे आदेश थेट पाक लष्करप्रमुखांकडून मिळाले होते. या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी नेतृत्वावरच संशयाची सुई वळली आहे.

मुनीर यांनी काय म्हटलं होतं?

इस्लामाबादमध्ये एका सभेत बोलताना मुनीर यांनी द्विराष्ट्र सिद्धांताचा (Two-Nation Theory) आधार घेत, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक फरक अधोरेखित केला. त्यांनी जनतेला उद्देशून म्हटलं, “पाकिस्तानच्या मुलांना आपली खरी कथा सांगितली गेली पाहिजे. आपली ओळख हिंदूंहून भिन्न आहे, म्हणूनच पाकिस्तान वेगळा अस्तित्वात आला.”

ते पुढे म्हणाले, “धर्म, परंपरा, चालीरीती, विचार आणि महत्त्वाकांक्षा या सर्व बाबतीत पाकिस्तानचा आत्मा वेगळा आहे, आणि हीच भावना पुढच्या पिढ्यांमध्ये पोचवण्याची गरज आहे.”

कोण आहे असीम मुनीर?

जनरल मुनीर यांचा जन्म एका शालेय शिक्षक आणि इमाम असलेल्या वडिलांच्या घरी झाला, यावरून असे दिसते की लष्कर प्रमुखांचे पालनपोषण धार्मिक वातावरणात झाले. मुनीर यांनी आपल्या भाषणांमध्ये इस्लामिक वचनांचा वापर केला आहे.

लष्कर प्रमुख, हाफिज-ए-कुरान (ज्यांनी संपूर्ण इस्लामिक पवित्र ग्रंथ लक्षात ठेवला आहे) आहेत आणि त्यांनी वेळोवेळी इस्लामिक विचारधारेला प्रोत्साहन देणारी भाषणे दिली आहेत. यापूर्वीची त्यांची कश्मीरवरील भाषणेही अशाच प्रकारची भडकाऊ होती.

मुनीर 2018 मध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे (Inter-Service Intelligence (ISI)) प्रमुख होते. पण तेथे ते जास्त काळ टिकले नाही. कारण तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशानंतर, आठ महिन्यांनी मुनीर यांच्या जागी लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांची नियुक्ती करण्यात आली. खान यांना पदावरून दूर केल्यानंतर, मुनीर यांना देशाचे लष्कर प्रमुख बनवण्यात आले.

त्यांनी 1986 मध्ये जिया-उल-हक यांच्या प्रशासनाखाली सैन्यात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमधून (OTS) पदवी घेतल्यानंतर, मुनीर फ्रंटियर फोर्स रेजिमेंटच्या 23 व्या बटालियनमध्ये दाखल झाले.

हल्ल्यापश्चात लष्कराची धडपड

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या प्रतिकारात्मक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल मुनीर यांच्यासह अनेक पाक लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना खाजगी विमानांतून ब्रिटन आणि न्यू जर्सी येथे हलवले आहे.

Share:

More Posts