Pakistan Asim Munir | पाकिस्तानात (Pakistan Politics) पुन्हा एकदा राजकीय बदलांच्या चर्चांनी जोर धरला आहे. पाकमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) हे राष्ट्रपतीपदी येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या आठवड्यात पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या जागी मुनीर येण्याच्या बातम्या फेटाळल्या होत्या, पण आता नव्या बैठकींमुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे.
बैठकींनी वाढला तर्कवितर्क
लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पंतप्रधान निवासस्थानी शेहबाज शरीफ यांची भेट घेतल्याने ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. त्यानंतर शेहबाज यांनी राष्ट्रपती झरदारींसोबत स्वतंत्र चर्चा केली.रिपोर्टनुसार, या बैठका 27व्या घटनादुरुस्तीच्या संभाव्य बदलांशी आणि झरदारी यांचा उत्तराधिकारी कोण, यावरून सुरू झाल्या आहेत.
दुसरीकडे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या अफवा निराधार असल्याचं म्हटलं, पण त्यांनी कबूल केलं की, शेहबाज यांच्यासोबत झरदारींच्या राजीनाम्याबाबत आणि मुनीर यांच्या शक्यतेबाबत चर्चा झाली. शेहबाज यांनीही मुनीर यांनी कधीच राष्ट्रपतीपदाची इच्छा व्यक्त केली नाही, असे म्हटले होते.
शेहबाज-झरदारींची चर्चा
संरक्षण मंत्र्यांनी पीएमएल-एन आणि पीपीपीमधील तणाव फेटाळला, पण सर्वोच्च न्यायालयाच्या राखीव जागांच्या निकालावर एकजूट राहण्याचं आश्वासन दिलं. झरदारी यांनी 27व्या घटनादुरुस्तीवर सध्या चर्चा नसल्याचं स्पष्ट केलं, पण गरज पडल्यास ती लोकशाहीचा भाग असल्याचंही नमूद केलं. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार की असीम मुनीर हे पद स्विकारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा –